Arjun Tendulkar | ‘हा तर क्रिकेटमधला उदय चोप्रा’; बॉलिवूड अभिनेत्याने साधला अर्जुन तेंडुलकरवर निशाणा
निर्माते यश चोप्रा यांचा मुलगा उदय चोप्राने 2000 मध्ये 'मोहब्बतें' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचा 'धूम' हा चित्रपट चांगलाच गाजला. मात्र बॉलिवूडमध्ये उदयला यशस्वी करिअर करता आलं नाही. आता तो वडील यश चोप्रा यांच्या कंपनीत सीईओ म्हणून काम करतो.
मुंबई : कोणत्याही क्षेत्रात जेव्हा वडील यशाचं शिखर गाठवतात, तेव्हा मुलाची तुलना साहजिकच त्या यशाशी आणि वडिलांशी केली जाते. मात्र एखादा मुलगा वडिलांइतकंच यश मिळवण्यात कमी पडत असेल, तर त्यावरून अनेकांकडून टीका होऊ लागते. याचा चांगलाच अनुभव अभिनेता अभिषेक बच्चनला आला आहे. अभिषेकच्या करिअरची तुलना अनेकदा अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाते. बिग बींना मिळालेलं यश अभिषेकला मिळू शकलं नाही, असंही म्हटलं जातं. आताच अशीच टीका एका बॉलिवूड अभिनेत्याने क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर केली आहे.
काय आहे अभिनेत्याचं ट्विट?
‘यशस्वी पित्याचा मुलगा नेहमी अयशस्वीच ठरतो. तुम्ही स्वत:च पहा, यश चोप्रा साहेबांचा मुलगा उदय चोप्रा आणि सचिन तेंडुलकरचा मुलगा क्रिकेटचा उदय चोप्रा’, अशी टीका या अभिनेत्याने केली आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून स्वयंघोषित चित्रपट समिक्षक कमाल आर. खान आहे. या ट्विटवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी केआरकेलाच खडेबोल सुनावले आहेत. ‘तुम्ही आजपर्यंत काही विशेष कामगिरी केल्याचं मला आठवत नाही. म्हणूनच तुमची बॉलिवूडमध्ये काहीच जागा नाही’, असं एकाने लिहिलंय. तर ‘तुझ्या मुलाचं काय होईल, ते नक्की सांग’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.
केआरकेनं आजवर असंख्य बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. शाहरुख खानपासून कंगना रणौत, सारा अली खान, सलमान खान, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार यांच्यासारख्या सेलिब्रिटींबाबत त्याने अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. केआरकेनं त्याच्या एका ट्विटमध्ये अभिषेक बच्चनचीही खिल्ली उडवली होती. ‘जेव्हा ज्युनियर बच्चनने युवा हा चित्रपट साइन केला तेव्हा एका मित्राने त्याला विचारलं की चित्रपटाची स्क्रिप्ट खूप चांगली आहे का? त्यावर अभिषेक त्याला म्हणाला, मी माझेच सीन्स वाचतो आणि माझे डायलॉग्स खूप चांगले आहेत. त्यामुळे मी हा चित्रपट साइन केला आहे. म्हणजेच त्याला संपूर्ण कथेविषयी काहीच माहीत नाही’, असं केआरके म्हणाला होता.
कामयाब बाप का बेटा अक्सर नाकामयाब ही होता है! ख़ुद ही देखलो, Yash Chopra saahab का बेटा Uday Chopra और Sachin Tendulkar का बेटा Cricket का Uday Chopra!
— KRK (@kamaalrkhan) May 18, 2023
निर्माते यश चोप्रा यांचा मुलगा उदय चोप्राने 2000 मध्ये ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचा ‘धूम’ हा चित्रपट चांगलाच गाजला. मात्र बॉलिवूडमध्ये उदयला यशस्वी करिअर करता आलं नाही. आता तो वडील यश चोप्रा यांच्या कंपनीत सीईओ म्हणून काम करतो.