Hera Pheri 3: ‘हेरा फेरी 3’मध्ये अक्षयची जागा कार्तिक घेणार? अखेर सुनील शेट्टीने सोडलं मौन
'हेरा फेरी 3'मधून अक्षयच्या एग्झिटबद्दल कळताच सुनील शेट्टीला बसला धक्का; कार्तिकच्या भूमिकेचं सांगितलं सत्य
मुंबई: परेश रावल, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार या तिघांच्या मुख्य भूमिका असलेला ‘हेरा फेरी’ हा चित्रपट बॉलिवूडमधल्या काही दमदार चित्रपटांपैकी एक मानला जातो. त्याच दुसरा भाग ‘फिर हेरा फेरी’सुद्धा प्रचंड हिट झाला होता. या चित्रपटातील मीम्स आजसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतात. गेल्या काही वर्षांपासून ‘हेरा फेरी 3’ची जोरदार चर्चा आहे. मात्र त्यात परेश, सुनील, अक्षय हेच त्रिकुट मुख्य भूमिका साकारणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अक्षय कुमारने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘हेरा फेरी 3’मध्ये नसल्याचं जाहीर करत चाहत्यांची निराशा केली. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर सुनील शेट्टी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमारची जागा अभिनेता कार्तिक आर्यनने घेतली, असंही म्हटलं जात होतं. त्यावरही सुनील शेट्टी यांनी उत्तर दिलं आहे. ‘हेरा फेरी’ हा चित्रपट 2000 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फिर हेरा फेरी’ या सीक्वेलसाठी हे त्रिकुट पुन्हा एकत्र आलं होतं.
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला, “अक्षय कुमारला पुन्हा हेरा फेरीच्या चित्रपटांमध्ये आणलं, तर ते उत्तम असेल. अक्षयची जागा कार्तिकने घेतल्याची चर्चा मी ऐकतोय. पण अक्षयची जागा कोणीच घेऊ शकत नाही. निर्मात्यांनी कार्तिकला वेगळ्या भूमिकेची ऑफर दिली आहे. त्यामुळे अक्षयच्या भूमिकेबाबत काही वाद नाही.”
“अक्षय चित्रपटात नसेल तर एक वेगळीच पोकळी निर्माण होईल. त्यामुळे नेमकं काय होतंय, ते पाहणं महत्त्वाचं आहे. मी सध्या धारावी बँक या चित्रपटात व्यस्त असल्याने मला या गोष्टी माहीत नव्हत्या. 19 नोव्हेंबरनंतर मी बसून हा विषय समजून घेईन आणि अक्कीशी याबद्दल बोलेन. नेमकं काय घडलंय हे त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करेन”, असंही सुनील शेट्टीने स्पष्ट केलं.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने ‘हेरा फेरी 3’च्या पटकथेबद्दल समाधानी नसल्याचं म्हटलं होतं. “हेरा फेरी या चित्रपटाशी अनेकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. पण इतक्या वर्षांत आम्ही त्याचा तिसरा भाग बनवला नाही, याचं मला वाईट वाटतं. मला चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती पण मी स्क्रीनप्ले आणि स्क्रीप्ट वाचल्यानंतर समाधानी नव्हतो. मला ते फार रुचलं नाही”, असं अक्षय म्हणाला.