बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ची OMG 2 शी टक्कर; सनी देओलचं सडेतोड उत्तर; तारा सिंगचा थेट इशारा
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालता होता. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला तुफान यश मिळालं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई | 24 जुलै 2023 : अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल तब्बल 22 वर्षांनंतर ‘गदर 2’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. येत्या 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट सीक्वेल आहेत. 2001 मध्ये सनी देओलचा ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. तर 2012 मध्ये अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून पसंती मिळाली होती. आता बॉक्स ऑफिसवर या दोन चित्रपटांच्या सीक्वेल्सची टक्कर होणार असून त्यावर सनी देओलने प्रतिक्रिया दिली आहे.
जेव्हा गदर : एक प्रेम कथा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हासुद्धा आमिरच्या ‘लगान’शी त्याची टक्कर झाली होती. याच घटनेची आठवण काढत सनी देओलने सडेतोड उत्तर दिलं. ‘ज्या गोष्टींची बरोबरी होऊ शकत नाही, त्यांची तुलना करू नका’, असा थेट सल्ला त्याने दिला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. “जेव्हा गदर प्रदर्शित झाला तेव्हासुद्धा लोक लगानला क्लासिक चित्रपट म्हणत होते. काहींचं असंही म्हणणं होतं की गदर हा जुन्या पद्धतीचा चित्रपट आहे. मात्र जेव्हा तो प्रदर्शित झाला तेव्हा वेगळंच पहायला मिळालं. लोकांनी त्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. त्यावेळी गदर चित्रपटाने 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. त्या तुलनेत लगानची कमाई खूपच कमी होती” असं तो म्हणाला.
या मुलाखतीत सनी देओलने त्याच्या ‘घायल’ या चित्रपटाचाही उल्लेख केला. ‘घायल’ या चित्रपटाची टक्कर ‘दिल’सोबत झाली होती. मात्र त्याचाही माझ्या चित्रपटावर काही परिणाम झाला नव्हता, असं तो म्हणाला. “लोकांना तुलना करायला आवडतं. पण जो चित्रपट जास्त चांगला असतो, त्याची तुलना दुसऱ्या चित्रपटांशी करू नये. ज्या गोष्टींची बरोबरी होऊ शकत नाही त्याची तुलना करू नका”, अशी विनंती सनी देओलने केली.
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालता होता. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला तुफान यश मिळालं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही अनिल शर्मा यांनीच केलंय. विशेष म्हणजे जवळपास 20 वर्षांनंतर प्रदर्शित होणाऱ्या या सीक्वेलमधील बरेच कलाकार हे पहिल्या भागातील आहेत.