मित्रा, हे सगळं तू पाहूनसुद्धा…; संतोष जुवेकरसाठी सुशांत शेलारची खास पोस्ट
अभिनेता संतोष जुवेकरला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता त्याला पाठिंबा देत अभिनेता सुशांत शेलारने खास पोस्ट लिहिली आहे.

गेल्या काही दिवसापासून एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे नाव ‘छावा’ असे आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना येसुबाईंच्या भूमिकेत दिसत आहे आणि अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार दिसले आहे. अभिनेता संतोष जुवेकरने रायाजी या भूमिकेत दिसत आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये ‘मी अक्षय खन्नाशी बोललोच नाही’ असे म्हटले. त्यानंतर संतोष जुवेकरला प्रचंड ट्रोल केले गेले. आता त्याला पाठिंबा देत सुशांत शेलारने पोस्ट केली आहे.
काय आहे सुशांतची पोस्ट?
अभिनेता सुशांत शेलारने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या जवळचा मित्र, संतोषसोबत दिसत आहे. दोघांचाही हा जुना फोटो दिसत आहे. हा फोटो शेअर करत सुशांतने, ‘खरं सांगायचं तर, आजकाल एखाद्याने प्रामाणिकपणे आपली मतं मांडली, की लगेच काही लोक ट्रोलिंगच्या मागे लागतात. आणि जेव्हा आपला एखादा खास मित्र अशा गोष्टींचा सामना करत असतो, तेव्हा मन हेलावून जातं. संतोष जुवेकर हा फक्त एक अभिनेता नाही, तर आपल्या भूमिकांमधून जनतेच्या मनात घर करणारा संवेदनशील कलाकार आहे. त्याने समाजप्रवाहात झोकून दिलेलं योगदान आणि त्याची स्पष्टवक्तेपणा हीच त्याची खरी ताकद आहे. पण दुर्दैवाने, काही लोक ही ताकद दुर्बलता समजतात आणि जाणीवपूर्वक त्याला लक्ष्य करत आहेत’ असे म्हटले आहे.




वाचा: 24व्या वर्षी लग्न, २७व्या वर्षी विधवा; कोण आहे स्मिता पाटीलची भाची?
पुढे संतोषविषयी बोलताना सुशांत म्हणाला, ‘मित्रा संतोष, हे सगळं तू पाहूनसुद्धा शांत आहेस, कारण तुला माहीत आहे – वेळच खरं उत्तर देते. पण तरीही, एक खरा मित्र म्हणून मला आज तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते.या ट्रोलिंगमागं आहे द्वेष, असुरक्षितता, पण तुझ्या मागे आहे प्रेम, आदर आणि माणुसकी. तू केलेल्या अशा कितीतरी भूमिकेतून तु लोकांना प्रेरणा दिलीस – त्यांची साथ आज तुझ्यासोबत आहेच, आणि आम्ही सुद्धा पूर्ण ताकदीनं, मनापासून. दुरून आवाज करणाऱ्यांना सोडून दे – कारण ते कधीच आपल्या जवळ येत नसतात. संतोष, तू खंबीर उभा राहा. तू एकटाच नाहीस.’
नेमकं काय झालं होतं?
संतोष जुवेकरने एका वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने शुटिंगचा अनुभव सांगितला. त्यावेळी तो म्हणाला, “छावा सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या आहेत त्या कोणाशीच मी बोललो नाही. शूटिंग सुरु असताना मी तरी त्यांच्याशी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचे शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो, बोललो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलंपण नाही. माझा काही अक्षय खन्नावर राग नाही. त्याने उत्तमच काम केलं आहे. पण, माहीत नाही का त्यांच्याशी बोलावंसंच मला वाटलं नाही.”