Sushant | 3 वर्षांनंतरही सुशांतच्या मृत्यूचा तपास जैसे थेच! सीबीआयकडून कधी मिळणार उत्तर?
2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सीबीआयने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात तपासाची स्थिती जाहीर करावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.
मुंबई : तीन वर्षांपूर्वी 14 जून 2020 रोजी मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृतावस्थेत आढळला होता. या वृत्ताने संपूर्ण इंडस्ट्रीला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, याचा तपास गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र अद्याप कोणताच पुरावा सीबीआयच्या हाती लागला नाही. किंबहुना याप्रकरणी सीबीआयने अद्याप चार्जशीटसुद्धा दाखल केला नाही. त्यामुळे सुशांतला न्याय कधी मिळेल याची प्रतीक्षा अद्याप त्याचे असंख्य चाहते आणि कुटुंबीय करत आहेत.
सीबीआय करत आहे सुशांतच्या मृत्यूचा तपास
सुशांतच्या निधनानंतर बिहार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर ही केस केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांच्या तपासानंतरही सीबीआयने अद्याप आरोपपत्र दाखल केलं नाही किंवा तो खटला बंद केला नाही. इतकंच नव्हे तर तपास कुठपर्यंत आला आहे याबद्दलही सीबीआयने मौन बाळगलं आहे. 2020 मध्ये स्थानिक वांद्रे पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक कलाकार आणि निर्मात्यांचे जबाब नोंदवले होते. तर सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आत्महत्या असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
AIIMS डॉक्टरांचा रिपोर्ट
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (AIIMS) डॉक्टरांनी ऑक्टोबर 2020 मध्ये सुशांतचा व्हिसेरा आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांनीसुद्धा सुशांतने आत्महत्ये केल्याचा निष्कर्ष केंद्रीय एजन्सीला सांगितला होता. मात्र आता सुशांतच्या मृत्यू प्रकरणाबाबत प्रतिक्रिया विचारली असता सीबीआयच्या कोणत्याच अधिकाऱ्याकडून उत्तर मिळत नाही.
दिशा सालियानच्या मृत्यूचं कनेक्शन
सुशांतच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला होता. त्याची हत्या झाल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला होता. सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्याच्या आठवड्याभरातच सुशांत मृतावस्थेत आढळला होता. त्यामुळे या दोघांच्या मृत्यूप्रकरणात काहीतरी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. मात्र त्यातही कोणताही गैरप्रकार आढळून आला नाही.
रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल
सुशांतच्या वडिलांच्या जबाबानंतर बिहार पोलिसांनी त्याची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचे कुटुंबीय आणि सुशांतच्या घरी काम करणाऱ्या हेल्परविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर सीबीआयने हत्येचा तपास हाती घेतला आणि रियासह त्यांनी अनेकांचे जबाब नोंदवले.
रिया चक्रवर्तीच्या फोनवरून मिळवलेल्या चॅटच्या आधारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) तिच्या भावाविरोधात गुन्हा नोंदवला होता. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीने सुशांतला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप एनसीबीने केला होता. एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे या प्रकरणाचा तपास करत होते. सध्या वानखेडे यांच्यावर सीबीआयकडून दुसऱ्या प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.
समीर वानखेडेंकडून बॉलिवूडमधील ड्रग्जचा तपास
वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सुशांतच्या मृत्यूप्रकरणाद्वारे एनसीबीने बॉलिवूडमध्ये ड्रग्जच्या वापरावर चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांसारख्या मोठमोठ्या कलाकारांनी चौकशी करण्यात आली होती. अखेर एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकला अटक केली. या प्रकरणात 33 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. रिया आणि शौविकची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका
2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सीबीआयने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात तपासाची स्थिती जाहीर करावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली. संबंधित याचिकाकर्त्याला सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितलं होतं.