Sushmita Sen | ‘आता आजारपण घाबरवत..’; हार्ट अटॅकबद्दल सुष्मिता सेनची प्रतिक्रिया चर्चेत
खूप मोठ्या हार्ट अटॅकनंतर सुष्मिता वाचली होती. तिच्या आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेज होतं. तिच्यावर अँजियोप्लास्टी झाली आणि स्टेंटसुद्धा लागले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुष्मिता त्या संपूर्ण अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
मुंबई | 31 जुलै 2023 : आपल्या फिटनेसबद्दल जागरूक असणारी अभिनेत्री सुष्मिता सेनला मार्च महिन्यात जेव्हा हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. खूप मोठ्या हार्ट अटॅकनंतर सुष्मिता वाचली होती. तिच्या आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेज होतं. तिच्यावर अँजियोप्लास्टी झाली आणि स्टेंटसुद्धा लागले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुष्मिता त्या संपूर्ण अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “आता मला आजारपण घाबरवत नाहीत, उलट आयुष्याची नव्याने सुरुवात करण्याची शिकवण मला मिळाली”, असं ती म्हणाली.
मार्च महिन्यात सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डिस्ने प्लस हॉटस्टारवरील ‘आर्या 3’ची शूटिंग थांबवण्यात आली. उपचारानंतर तिने लगेचच कामाला सुरुवात केली आणि वेब शोचं शूटिंग पूर्ण केलं. हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर सुष्मिताने 2 मार्च रोजी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याविषयीचा खुलासा केला होता.
‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिता म्हणाली, “आयुष्यातील तो एक टप्पा होता आणि तो मी पार केला आहे. मी खूप नशिबवान आहे की त्या टप्प्याला पार करून मी पुढे येऊ शकले. पण आता मला आजारपणाची भिती वाटत नाही. उलट आता मी आयुष्याकडे आणखी सकारात्मकतेने पाहते. जेव्हा तुम्हाला नव्यानं आयुष्य मिळतं, तेव्हा तुम्ही त्याचा आणखी आदर आणि काळजी करता.”
View this post on Instagram
सुष्मिताच्या आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेजेस होते. यातून बरं होताच तिने पुन्हा एकदा वर्कआऊट सुरू केलं होतं. इतकंच नव्हे तर हार्ट अटॅकनंतर दोन आठवड्यांच्या आत तिने लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉकसुद्धा केला. सुष्मिता इतकं वर्कआऊट करून सुद्धा, इतकी फिट दिसत असूनसुद्धा तिला हार्ट अटॅक कसा आला, असा प्रश्न अनेकांच्या मनात घोंघावत होता. त्याचप्रमाणे जिममध्ये जाऊनसुद्धा तिला हार्ट अटॅक आला, असंही काहींनी म्हटलं होतं. या सर्व प्रश्नांची उत्तरं सुष्मिताने दिली होती.
इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये सुष्मिता म्हणाली होती, “मला माहितीये की तुमच्यापैकी बरेच जण जिमला जाणं सोडून देतील. जिमला जाऊनसुद्धा तिला काहीच फायदा झाला नाही, असंही तुम्ही म्हणाल. पण हे योग्य नाही. उलट व्यायाम करणं, जिमला जाणं यांमुळे मला बरीच मदत झाली. मोठ्या हार्ट अटॅकमधून मी वाचले. ॲक्टिव्ह लाइफस्टाइलमुळेच हे शक्य झालं.”