“मला हे स्पष्टपणे सांगायचंय की..”; ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांसोबतच्या वादावर जेठालालने सोडलं मौन
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांच्यासोबत सेटवर कडाक्याचं भांडण झाल्याच्या चर्चांवर अभिनेते दिलीप जोशी यांनी मौन सोडलं आहे. त्याचप्रमाणे मालिका सोडणार की नाही, या प्रश्नाचंही त्यांनी उत्तर दिलंय.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आणि निर्माते असितकुमार मोदी यांच्यात सेटवर कडाक्याचं भांडण झाल्याच्या चर्चा आहेत. दिलीप जोशी हे निर्मात्यांकडे सुट्ट्यांविषयी बोलायला गेले असता त्यांनी दुर्लक्ष केल्याचं म्हटलं गेलं. यामुळे राग अनावर झालेल्या दिलीप यांनी थेट असितकुमार यांची कॉलरच पकडली. इतकंच नाही तर त्यांनी मालिका सोडण्याचाही इशारा दिल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व चर्चांवर अखेर दिलीप जोशी यांनी मौन सोडलं आहे. सेटवर झालेल्या भांडणाच्या चर्चा केवळ अफवा असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे ही मालिका सोडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
वादावर दिलीप जोशी यांचं स्पष्टीकरण-
“मला या सर्व अफवांवर सर्व काही स्पष्ट करायचं आहे. माझ्या आणि असितभाईंबद्दल मीडियामध्ये काही बातम्या आहेत ज्या पूर्णपणे खोट्या आहेत आणि अशा गोष्टी ऐकून मला खूप वाईट वाटतं. तारक मेहता का उल्टा चष्मा हा एक असा शो आहे जो माझ्यासाठी आणि माझ्या लाखो चाहत्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा लोक बिनबुडाच्या अफवा पसरवतात तेव्हा ते केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या निष्ठावंत प्रेक्षकांनाही त्रास देतात. इतक्या वर्षांपासून अनेक लोकांना खूप आनंद देणाऱ्या एखाद्या गोष्टीबद्दल अशा पद्धतीने नकारात्मकता पसरवणं निराशाजनक आहे. प्रत्येक वेळी अशा अफवा समोर आल्यावर असं दिसतं की त्या पूर्णपणे खोट्या आहेत. हे आपल्याला सतत समजावलं जात आहे. हे कंटाळवाणं आणि निराशाजनक आहे. कारण ज्यांना हा शो आवडतो ते जेव्हा अशा गोष्टी वाचतात तेव्हा ते अस्वस्थ होतात.”
“याआधी मी शो सोडल्याच्या अफवा पसरवल्या होत्या, त्या पूर्णपणे खोट्या आहेत. आता असं दिसतंय की दर काही आठवड्यांनी असित भाई आणि मालिकेला बदनाम करण्यासाठी नवीन कथा रचण्याचा प्रयत्न केला जातोय. यासारख्या गोष्टी पुन्हा पुन्हा समोर येत आहेत हे पाहून वाईट वाटतं. काहीवेळा याबाबतीत मी काहीच करू शकत नाही. काही लोकांना मालिकेच्या सततच्या यशाचा हेवा वाटतो का? या अफवा पसरवण्यामागे कोणाचा हात आहे हे मला माहीत नाही, पण मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की मी इथेच आहे, मी दररोज त्याच प्रेमाने आणि आवडीने काम करत आहे. मी मालिका सोडून कुठेही जाणार नाही.”
“या मालिकेला सर्वोत्तम बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेत आम्ही सर्वजण एकत्र उभे आहोत आणि अशा दु:खद कथा छापण्यापूर्वी मीडियाने तथ्यांची पुष्टी करण्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी माझी इच्छा आहे. या शोमुळे मिळणाऱ्या सकारात्मकतेवर आणि आनंदावर लक्ष केंद्रित करूया. आम्हाला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल आमच्या चाहत्यांचे आभार मानतो”, असं त्यांनी स्पष्ट केलं.