Taarak Mehta: ‘तारक मेहता..’ बंद होणार? मालिका सोडलेल्या दिग्दर्शकाची पत्नी म्हणाली “शोचा टीआरपी…”
'तारक मेहता'चा TRP घसरला; कलाकारांनंतर आता दिग्दर्शकानेही मालिकेकडे फिरवली पाठ, लोकप्रिय शो होणार बंद?
मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी बाजी मारायची. मात्र गेल्या काही महिन्यात या मालिकेतून बऱ्याच कलाकारांनी निरोप घेतला. मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनीसुद्धा आता या लोकप्रिय मालिकेला रामराम केला आहे. त्यानंतर मालिकेचा टीआरपी घसरल्याची माहिती समोर येत आहे. यावर आता मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया अहुजा हिने प्रतिक्रिया दिली आहे.
प्रिया ही दिग्दर्शक मालव यांची पत्नीसुद्धा आहे. काही महिन्यांपूर्वी तिनेसुद्धा मालिका सोडली होती. त्याच्याआधी शैलेश लोढा, दिशा वकानी, भव्य गांधी, राज अनाडकत यांसारख्या कलाकारांनीही मालिकेचा निरोप घेतला. मात्र तरीही ही मालिका प्रेक्षकांच्या लोकप्रिय मालिकांच्या यादीत अग्रस्थानी होती.
‘तारक मेहता..’ ही मालिका आता पहिल्यासारखं प्रेक्षकांचं मनोरंजन करत नाही, असंही काही जणांनी म्हटलंय. मालिकेतून लोकप्रिय कलाकार बाहेर पडल्याने निर्माते चिंतेत आहेत. तर आता मालिकेचा टीआरपीसुद्धा पहिल्यासारखा राहिला नसल्याचं कळतंय.
मालिकेच्या घसरत्या टीआरपीबद्दल प्रिया अहुजा म्हणाली की शोच्या क्वालिटीमध्ये कोणतीच कमतरता नाही. मात्र हा फक्त बघणाऱ्यांचा दृष्टीकोन आहे. “मला कधीच टीआरपीचा खेळ समजला नाही. मात्र मी मानत नाही की तारक मेहता ही मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे”, असं ती म्हणाली.
“टीआरपी कमी-जास्त होतच असते. कारण आजकाल लोक मालिका सोडून इतरही बऱ्याच गोष्टी बघत असतात. हल्ली टीव्हीवर येणाऱ्या मालिका पाहण्यापेक्षा जमेल तसं ओटीटीवर ते एपिसोड पाहणं पसंत करतात. कामातून वेळ मिळतो तेव्हा ते आपले आवडते चित्रपटसुद्धा ओटीटीवर पाहतात”, असंही तिने सांगितलं.
मालिकेतील दयाबेनच्या भूमिकेबद्दल ती पुढे म्हणाली, “ही गोष्ट खरी आहे की काही भूमिका अशा असतात, ज्या प्रेक्षकांवर आपली वेगळीच छाप सोडतात. लोक त्या भूमिकेचे चाहते होतात. मात्र एखाद्या ठराविक भूमिकेपेक्षा लोक या संपूर्ण मालिकेलाच जास्त समर्पित आहेत असं मला वाटतं.”