TMKOC | “सेटवर पुरुषांचं वर्चस्व असतं तर..”; जेनिफरच्या आरोपांनंतर ‘आत्माराम भिडे’ निर्मात्यांच्या मदतीला
निर्मात्यांवर आरोप करत जेनिफर म्हणाली, “असित मोदी यांनी याआधीही लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला काम गमावण्याची भिती होती. पण आता पुरे झालं. त्यांनी मला सेटवर बळजबरीने थांबवण्याचा प्रयत्न केला."
मुंबई : सोनी सब वाहिनीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत कोणत्या ना कोणत्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. जवळपास 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतून काही कलाकारांनी अचानक निरोप घेतला. त्यानंतर आता मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसिवालने निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर तिने निर्माते आणि प्रॉडक्शन टीमविरोधात तक्रारदेखील दाखल केली आहे. याप्रकरणी आता मालिकेत आत्माराम तुकाराम भिडेची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मी असित मोदी यांना एक उत्तम निर्माता मानतो. ते एक आदर्श फॅमिली मॅन आहेत. त्यांच्यासारखा चांगला निर्माता भेटू शकत नाही. देवावर विश्वास ठेवणारी ती अत्यंत साधी व्यक्ती आहे. त्यांच्यामुळे ही मालिका इतके वर्ष चालू शकली. जर या मालिकेच्या सेटवर फक्त पुरुषांचं वर्चस्व असतं तर ही मालिका 15 वर्षांपर्यंत चालू शकली नसती.”
निर्मात्यांची बाजू घेत ते पुढे म्हणाले, “मला आश्चर्यही वाटतंय आणि या गोष्टीचं फार दु:खही आहे की अशा प्रकारचे आरोप का लावले जात आहेत आणि इतकी वर्षे वाट पाहिल्यानंतर आताच का हे सर्व बोललं जातंय? एका मालिकेत अनेक वर्षे काम करणाऱ्या लोकांचे विचार वेगळे असू शकतात. मतभेदांमुळे आपापसांत वाद होऊ शकतात. मात्र असे आरोप लावले जाऊ शकत नाही.”
नेमकं काय घडलं?
निर्मात्यांवर आरोप करत जेनिफर म्हणाली, “असित मोदी यांनी याआधीही लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला काम गमावण्याची भिती होती. पण आता पुरे झालं. त्यांनी मला सेटवर बळजबरीने थांबवण्याचा प्रयत्न केला. गेट बंद करून मला बाहेर जाण्यापासून रोखलं. महिनाभरापूर्वी मी मेलद्वारे तक्रार केली होती, पण त्यावर मला काहीच उत्तर मिळालं नाही. मला खात्री आहे की ते या आरोपांचा तपास करतील. मी वकिलाची नियुक्ती केली आहे आणि मला लवकरच न्याय मिळेल.”
निर्माते असितकुमार मोदी यांची प्रतिक्रिया-
“ती आमची आणि मालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू. आम्ही तिचा करार संपवल्याने ती आता तथ्यहीन आरोप करतेय”, असं असितकुमार मोदी म्हणाले.