“माझ्यावरती अन्याय झालाय..”; तेजस्विनी पंडितने पोस्ट केलेल्या राज ठाकरेंच्या व्हिडीओची चर्चा
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अवघ्या काही तासांवर असून विविध पक्षांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. अशातच आपली राजकीय मतं बिनधास्तपणे मांडण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आहे. “माझ्यावरती अन्याय झालाय हे माझ्याशी तरी कुणी बोलायचं नाही,” असं ते या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या या शब्दांनंतर व्हिडीओत त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे काही फोटो पहायला मिळत आहेत. या व्हिडीओत राज ठाकरेंच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षणही पहायला मिळत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले, ते क्षणही या व्हिडीओत पहायला मिळत आहेत.
राज ठाकरे काय म्हणाले?
“मी कधी माझ्या चेहऱ्यावर भासू दिलं का रे, की माझ्या बाबतीत काय चाललंय? कसले हेवेदावे घेऊन बसलात रे तुम्ही, कुठे घेऊन जाणार आहात ती भांडणं? लोकांना अशी भांडणारी, कुंठत राहणारी अशी माणसं आवडत नाही. त्यामुळे माझ्यावरती अन्याय झालाय हे माझ्याशी तरी कुणी बोलायचं नाही,” असं ते या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. तेजस्विनीने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘पाऊल थकलं नाही.. निःशब्द!’
View this post on Instagram
तेजस्विनीने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘तू न कशाचा विचार करता तुझ्या भूमिका स्पष्टपणे मांडतेस. अप्रतिम,’ असं एकाने लिहिलंय. तर ‘राजसाहेब ठाकरे सत्तेत येणं काळाची गरज बनली आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘साहेब आधीही लढत होते आणि आताही लढत आहेत. महाराष्ट्राला साहेबांनी सत्तेत येणं गरजेचं आहे,’ असं मत नेटकऱ्यांनी मांडलं आहे.
तेजस्विनी अनेकदा मोकळेपणे राज ठाकरेंचं समर्थन करताना दिसते. सोशल मीडियावर ती त्यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टही लिहिते. ‘हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा. इतका नि:स्वार्थी भावना असणारा आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता. साहेब तुमच्या राजकारणाविषयी, तुम्ही घेतलेल्या भूमिकेंविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेणंदेण पण नाही. किंबहुना “तुम्हाला जाणलेल्या” कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं तुमच्याविषयीचं प्रेम त्यामुळे तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे. तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत रहा. आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे,’ अशी पोस्ट तेजस्विनीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिली होती.