Aamir Ali: “तो अत्यंत वाईट काळ, पूर्णपणे खचलो होतो”; घटस्फोटाबाबत अखेर आमिर अलीने सोडलं मौन
लग्नाच्या नऊ वर्षांनंतर अभिनेता आमिर अली आणि संजिदा शेख विभक्त झाल्याचं कळतंय. या घटस्फोटाविषयी दोघांनीही मौन बाळगलं होतं. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अखेर तो संजिदासोबतच्या घटस्फोटाबाबत मोकळेपणे व्यक्त झाला.
अभिनेता आमिर अली (Aamir Ali) आणि संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) यांच्यातील घटस्फोट (Divorce) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर टेलिव्हिजनवरील ही लोकप्रिय जोडी विभक्त झाली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिरने त्याला त्याच्या मुलीला भेटू देत नसल्याची तक्रार केली. आमिर आणि संजीदा यांना आयरा ही मुलगी आहे. घटस्फोटानंतर संजीदाशी कोणताच संपर्क नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. “एखादं नातं कितीही परफेक्ट दिसत असलं तरी कधी कधी ते टिकत नाही. संजीदाला खूश ठेवणारा पार्टनर तिला मिळो. फक्त प्रेमासाठी दोन जणांनी एकत्र यावं. जर एकत्र येण्याचं कारण प्रेमाशिवाय दुसरं कोणतं तरी असेल तर समस्या तिथूनच निर्माण होतात”, असं आमिर म्हणाला.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर पुढे म्हणाला, “माझ्यासाठी तो काळ खूप कठीण होता. घटस्फोटानंतर मी पूर्णपणे खचलो होतो. माझा स्वभाव अत्यंत उत्साही आहे आणि मी कधीच हार मानत नाही. मात्र संजीदाशी विभक्त झाल्यानंतर मला सावरायला काही वेळ गेला. मी पुन्हा पहिल्यासारखा झालोय, याचं मला समाधान आहे. मी कोणासाठीही वाईट विचार करत नाही आणि संजीदालाही तिचा आनंद मिळावा अशी माझी इच्छा आहे. प्रत्येकाला आनंदी राहण्याचा अधिकार आहे.”
View this post on Instagram
घटस्फोटानंतर मुलगी आयराला भेटू देत नसल्याचं आमिरने यावेळी सांगितलं. “हा अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि मला त्याबद्दल फार काही बोलायचं नाही. मला इथे काहीच सिद्ध करायचं नाहीये, पण नेहमीच पुरुषाला जबाबदार ठरवलं जातं. माझ्या खासगी आयुष्याबद्दल मी नेहमीच आदरयुक्त मौन बाळगलं आहे. ज्या व्यक्तीसोबत मी इतकी वर्षे राहिलो, त्या व्यक्तीचा सन्मान जपणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आयराची काळजी ते योग्य प्रकारे घेत असतील अशी मी अपेक्षा करतो”, असं आमिर म्हणाला. घटस्फोटानंतर आयराचं पालकत्व संजीदाला मिळालं आहे. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आमिर आणि संजीदा यांनी 2012 मध्ये लग्न केलं. 2020 मध्ये त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.