जानेवारी २०२१ मध्ये मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) आणि मेहुल पै (Mehul Pail) यांनी दुसरं लग्न करत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. लग्नाला वर्ष पूर्ण होण्याआधीच मेहुलला कॅन्सरचं (Cancer) निदान झालं आणि कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. मेहुलवर सध्या कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. तो आता ठीक असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती अभिज्ञाने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे दिली होती. अभिज्ञाने नुकताच इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी ती मेहुलच्या कॅन्सरबद्दल बोलताना भावूक झाली. या लाइव्हमध्ये अभिज्ञाच्या अनेक चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी तिला तिचा पती मेहुल पै आणि त्याच्या प्रकृतीविषयी प्रश्न विचारले.
एका चाहत्याने अभिज्ञाला विचारलं, “घरचे कसे आहेत”? त्यावर अभिज्ञा भावूक झाली आणि म्हणाली, “मी काही महिन्यांनंतर इंस्टाग्रामवर LIVE येण्याचा निर्णय घेतला कारण मी माझ्या वैयक्तिक समस्यांमध्ये व्यस्त होते. मला बरं वाटत नव्हतं पण आता मला वाटतं की मी ठीक आहे.” मेहुलच्या प्रकृतीविषयी विचारणाऱ्यांना तिने पुढे सांगितलं, “तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीसाठी तुमचे आभार. घरी सर्वजण ठीक आहेत. मेहुलसुद्धा ठीक आहे. मेहुल बरा होत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कदाचित एक-दोन महिन्यांत तो पूर्णपणे बरा होईल. माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर मला तुमच्या प्रेमाची गरज आहे.
तुमचं प्रेम नेहमी माझ्यासोबत राहू द्या.”
मेहुलने रुग्णालयातील फोटो पोस्ट करत लिहिलं होतं, ‘माझ्या आयुष्यात मला अनेक मूर्ख भेटले, परंतु कर्करोग हा त्यापैकी सर्वांत मोठा आहे. मला माफ कर, पण तू चुकीच्या व्यक्तीला निवडलंस.’ या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. अभिज्ञाची सर्वांत खास मैत्रीण मयुरी देशमुख हिनंसुद्धा कमेंट करत अभिज्ञा आणि मेहुलला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तू रॉकस्टार आहेत. ही लढाई तू नक्की जिंकणार’, असं तिनं लिहिलं आहे. ऋतुजा बागवे, अक्षया देवधर यांसारख्या कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत.
अभिज्ञा सध्या ‘तु तेव्हा तशी’ या मालिकेत पुष्पावल्ली ही नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारतेय. या मालिकेत स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळस्कर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
हेही वाचा:
Ratris Khel Chale 3: ‘रात्रीस खेळ चाले 3’मध्ये येणार मोठा ट्विस्ट; माईंवर पडणारी काळी सावली कोणाची?
बूट घालून हनुमान चालिसावर नृत्य केल्याने सुखविंदर वादाच्या भोवऱ्यात; टीका होताच म्हणाले…