विविध हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री छवी मित्तलवर (Chhavi Mittal) स्तनाच्या कर्करोगाची (breast cancer) अखेर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती दिली. व्यायाम करताना छातीला दुखापत झाल्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यास तिला स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. मात्र त्याने खचून न जाता छवीने सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहित सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला. जवळपास सहा तास तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. त्याच्या एक दिवस आधीसुद्धा तिने आनंदाने नाचतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. आता छवी कर्करोगमुक्त झाली आहे. मात्र शस्त्रक्रियेनंतर (breast cancer surgery) असह्य वेदना होत असल्याचं तिने पोस्टमध्ये सांगितलं.
‘शस्त्रक्रिया सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी मला डोळे बंद करून काहीतरी सकारात्मक, चांगलं विचार करायला सांगितलं होतं. तेव्हा मी अत्यंत निरोगी स्तनांचा विचार केला आणि डोळे बंद केले. आता मी कर्करोगमुक्त झाल्यावरच उठेन हे मला ठाऊक होतं. सहा तास ही शस्त्रक्रिया चालू होती. आता मला बरं होण्यासाठी वेळ लागले. पण सर्वांत चांगली बाब म्हणजे आता मी बरी होणार आहे. आजारपणाचा काळ संपला आहे, जे वाईट होतं ते संपलंय. तुमच्या प्रार्थनांची मला आता जास्त गरज लागणार आहे. कारण शस्त्रक्रियेनंतर मला असह्य वेदना होत आहेत. या वेदना मला आठवण करून देत आहेत की मी हसून ही लढाई जिंकली आहे. माझ्या जोडीदाराशिवाय मी हे करू शकले नसते. मोहीत हुसैन, जो माझ्यासारखाच खंबीर, धाडसी, धीर देणारा, काळजी घेणारा, प्रेम करणारा आणि वेडा आहे. यापुढे मला तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू पहायचे नाहीत’, अशा शब्दांत छवीने भावना व्यक्त केल्या.
छवीने आतापर्यंत ‘तीन बहुरानियाँ’, ‘तुम्हारी दृष्टी’, ‘घर की लक्ष्मी बेटियाँ’, ‘बंदिनी’ आणि ‘नागिन’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अशी ती अभिनेत्री आहे.