झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) या कार्यक्रमाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. सुबोध भावेनं कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात ही महिलांची राखीव बस एका सुप्रसिद्ध खास व्यक्तीसाठी थांबवली आणि ती व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis). सुबोध भावे (Subodh Bhave) आणि महिला मंडळ हे या भागात अमृता फडणवीसांचा आतापर्यंतचा प्रवास उलगडणार आहेत आणि त्यांना पेचात टाकणारे काही प्रश्नदेखील विचारणार आहेत. या कार्यक्रमातील महिला मंडळाने त्यांना खूप गमतीशीर प्रश्न विचारले आणि अमृता यांनी तेवढ्याच खुमासदार पद्धतीने त्यांची उत्तरं दिली आहेत.
या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्याबद्दल जाणून घेताना प्रेक्षकांना आणि महिला मंडळला एक गोष्ट जाणवली की त्या खूप आधुनिक विचारांच्या आहेत. कार्यक्रमातील महिला मंडळाने विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मोकळेपणाने आणि खूप मजेदार उत्तर दिली आहेत. यात महिला मंडळाने विचारलेल्या गळ्यातील मंगळसूत्रबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर फारच खुमासदारपणे दिलं. “तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर सासूबाई ओरडत नाहीत का?”, असा प्रश्न अमृता यांना विचारला होता. त्यावर त्या म्हणाल्या, “मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतिक आहे. ते गळ्यात घातलं तर पतीने तुमचा गळा पकडला की काय असं वाटतं, त्यामुळे मी मंगळसूत्र हातात घालते. त्यामुळे देवेंद्रजींनी सतत माझा हात धरला आहे, असं मला वाटतं.”
यावेळी त्यांना प्लास्टिक सर्जरी केली का असाही प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर देताना अमृता म्हणाल्या की, “बरं झालं तुम्ही मला हा प्रश्न विचारलात. मला यावरुन अनेक लोक सोशल मीडियावर ट्रोल करतात. प्लास्टिक सर्जरी ही खूप महागडी गोष्ट आहे. त्यामध्ये मोठा धोकाही असतो. काहीही बिघडलं तर तुमच्या चेहऱ्याची सगळी फिचर्स बिघडू शकतात. मी लग्नापूर्वी एकदाही ब्युटी पार्लरमध्ये गेले नव्हते. फक्त लग्नाच्यावेळी जो मेकअप करतात, तेवढाच मी केला होता. देवेंद्रजी यांच्यासाठी माझा चेहरा महत्त्वाचा नाही. ते स्त्रीचा चेहरा नाही तर तिचं मन पाहतात.” अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
पुढच्या सहप्रवासी या प्रसंगात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो येतात त्या म्हणाल्या, “वाह, आज वेळ मिळाला वाटतं? आज कुठे, आसामला नेणार का?” त्यांच्या या मिश्कील प्रश्नावर सर्वजण खळखळून हसले. झी मराठीवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम शुक्रवार आणि शनिवार रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतो.