‘मी सुनील पाल, 2 डिसेंबरला माझं अपहरण झालं होतं…’, किडनॅपिंगनंतर समोर आला कॉमेडियन, पाहा काय-काय सांगितलं?
प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल याची अपहरणातून सुरक्षित सुटका झाली आहे. सुनील पाल 1 डिसेंबरला लाईव्ह शो करण्यासाठी मुंबईतून बाहेर गेला होता. पण तो 3 डिसेंबरला घरी पोहोचला नव्हता. त्यानंतर त्याचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती.
‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला कॉमेडियन सुनील पाल नुकतंच मोठ्या संकटाला सामोरं गेला. सुनील पालला काही लोकांनी किडनॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. सुनील पाल याची किडनॅपर्सच्या तावडीतून सुखरुप सुटका झाली आहे. यानंतर सुनील पालची पत्नी आणि स्वत: सुनील पाल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सुनील पाल याची पत्नी सरिता पाल यांनी ‘टीव्ही 9 हिंदी डिजीटल’ला प्रतिक्रिया दिली आहे. “सुनील आपल्या घरी मुंबई परतले आहेत. त्यांनी पोलिसांना अपहरण आणि अपहरणकर्त्यांची माहिती दिली आहे. पोलीस या प्रकरणात आम्हाला सहकार्य करत आहे. आम्हाला पोलिसांचं सहकार्य मिळत आहे. सुनील आता पूर्णपणे ठीक आहेत. आम्ही लवकरच याबाबत सविस्तर भाष्य करु. पण सध्या आम्ही एफआयआर आणि इतर महत्त्वाच्या फॉर्मलिटीज पूर्ण करत आहोत. तसेच पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतर आम्ही या विषयावर उघडपणे बोलू”, असं सरिता पाल यांनी सांगितलं.
सुनील पाल याचादेखील या प्रकरणावर भाष्य करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडीओत सुनील आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती देत आहे. “नमस्कार, मी सुनील पाल आहे. माझं 2 डिसेंबरला अपहरण झालं होतं. पण मी आता पूर्णपणे सुरक्षित आहे. मी त्या संकटातून बाहेर आलो आहे. आम्ही सध्या पोलिसांना स्टेटमेंट देत आहोत. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांना मी लवकरच उत्तर देईन. आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे. त्यामुळे मी आता एकदम ठीक आहे”, असं सुनील पाल या व्हिडीओत बोलताना दिसतोय. पण या व्हिडीओत सुनील पाल आपलं अपहरण कुणी आणि का केलं? याबाबत काहीच बोलताना दिसत नाही.
सुनील पाल लवकरच पत्रकार परिषद घेणार
सुनील पाल 1 डिसेंबरला लाईव्ह शो करण्यासाठी मुंबईतून बाहेर गेला होता. पण तो 3 डिसेंबरला घरी न पोहचल्याने त्याची पत्नी सरिता पाल हिने पोलीस ठाण्यात जावून तक्रार केली होती. मुंबई क्राईम ब्रांचकडून सुनील पाल यांचा शोध सुरु होता. पोलिसांनी सुनील पाल यांचा मोबाईल स्ट्रेस करत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, आपल्यासोबत घडलेल्या सर्व प्रसंगाबाबत सुनील पाल पत्नी सरिता पाल सोबत एकत्र पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे.