अभिनेत्री दीपा परबचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; मालिकेत ‘वहिनीसाहेबां’चीही खास भूमिका
दामिनी या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यावतरी भूमिकेत दिसणार आहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं पण बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अभिनेत्री दीपा परब (Deepa Parab) हिने मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमांत विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. दामिनी या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यावतरी भूमिकेत दिसणार आहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं पण बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील आगामी मालिका ‘तू चाल पुढं’मध्ये (Tu Chal Pudha) दीपा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची. एकत्र कुटुंब असलेल्या या घरी अश्विनीलादेखील त्यांच्या नवीन घरासाठी खारीचा वाटा देण्याची इच्छा या प्रोमोमधून झळकते. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब सोबतच तुझ्यात जीव रंगला मधील वाहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसतेय. ही मालिका येत्या 15 ऑगस्ट पासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
View this post on Instagram
आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना दीपा परब म्हणाली, “बऱ्याच काळानंतर मराठी दैनंदिन मालिका करताना स्वतःच्या घरी परतल्याची भावना आहे. तू चाल पुढं या मालिकेचं कथानक अतिशय सुंदर असून ही कथा गृहिणी असलेल्या अश्विनी भोवती फिरते आणि आपल्या कुटुंबासाठी ती काय करते हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल. बऱ्याच कालावधी नंतर मराठी मालिका करतेय त्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा भरभरून मिळेल अशी मी आशा करते. या मालिकेतील अश्विनी हि प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटेल आणि आपल्यातलीच एक कोणीतरी छोट्या पडद्यावर आपलं नेतृत्व करतेय आणि त्याचसोबत आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतेय हे त्यांना नक्कीच जाणवेल अशी मला खात्री आहे.”