Kiran Mane Post : ‘कट रचला जातोय; पण माझ्याकडेही पुरावे आहेत, वेळ आली की बाहेर काढेन’
बळी गेला ना, तर पूर्ण एका विचारधारेचा जात आहे. त्यामुळे आताच जागे व्हा. बहुजनांमधल्या एका कलाकाराचा गळा घोटला जातोय, हा कट असून तो उधळून लावला पाहिजे, असं मत अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी मांडलंय.
मुंबई/रायगड : बळी गेला ना, तर पूर्ण एका विचारधारेचा जात आहे. त्यामुळे आताच जागे व्हा. बहुजनांमधल्या एका कलाकाराचा गळा घोटला जातोय, हा कट असून तो उधळून लावला पाहिजे, असं मत अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी मांडलंय. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून वगळल्याच्या वादानंतर त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय.
गैरवर्तणुकीमुळे काढल्याचं प्रॉडक्शन हाऊसचं स्पष्टीकरण
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरच्या ‘मुलगी झाली हो’ ही मालिका आणि त्यातले कलाकार प्रकाशझोतात आलेत. यातील एक कलाकार किरण माने यांना मालिकेतून वगळण्यात आले. यावर सध्या वाद सुरू आहे. आपण राजकीय पोस्ट आणि विचार मांडत असल्यानं मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप माने यांनी केलाय. तर मालिकेनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे त्यांना काढल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.
‘माझ्याविरोधात बोलणाऱ्यांचे चेहरे बघावे’
किरण माने यांनी मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊससवर आरोप करत म्हटलंय, की माझ्याविरोधात बोलणाऱ्यांचे चेहरे बघावे, त्यांचे चेहरे वाचावे. माझ्या बाजुने बोलणारे जास्त लोक आहेत. सगळ्या माझ्या बिहिणींसारख्या आईंसारख्या आहेत. पुढे अजून काय काय निघणार आहे, हे पाहा.
‘माझ्याकडे पुरावे आहेत’
पॅनोरमा प्रॉडक्शनमधल्या लोकांनी जे सांगितलं तेच चॅनेलनं ऐकलं आणि प्रॉडक्शन हेड सुजाना घई यांनी चुकीची माहिती चॅनेलला पुरवली. पण माझ्याकडे अजून पुरावे आहेत. ते वेळ आली की बाहेर काढेल. पॅनोरमा प्रॉडक्शनमधले कर्मचारी शादाब शेख यांच्यावरही किरण माने यांनी गंभीर आरोप केलेत. माझी कधी बाजू ऐकून घेतली नाही असा आरोपही किरण माने यांनी केला. tv9 मराठीनं त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी ही माहिती दिली.
‘कारस्थानं सुरू’
किरण माने यांना मालिकेतून काढून टाकण्यामागे 3 वेगवेगळी कारणं समोर आलीत. सुरुवातीला राजकीय पोस्टमुळे काढलं अशी चर्चा होती, त्यानंतर व्यावसायिक कारणामुळे काढल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आणि आता मालिकेतल्या इतर कलाकारांशी गैरवर्तन, असं स्टार प्रवाहनं निवेदन दिलंय. त्यावर माने यांनी आपली बाजू मांडली असून आता प्रॉडक्शन हाऊसनं कटकारस्थान करायला सुरुवात केलीय, असं त्यांनी म्हटलंय.