होम मिनिस्टरच्या महामिनिस्टर (Maha Minister) या पर्वाच्या विजेतीला 11 लाखांची पैठणी मिळणार हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ही 11 लाखांची पैठणी (Paithani) पाहण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती. अखेर या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. 11 लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील 10 शहरांमध्ये चुरस रंगली होती. अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या दहा जणींमध्ये 11 लाखांच्या पैठणीसाठी सामना रंगला. अखेर फायनलिस्ट वहिनींना टक्कर देत रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे महामिनिस्टरच्या महाविजेत्या (Maha Minister Winner) ठरल्या.
11 लाखांची पैठणी आदेश भाऊजीनी वहिनींना बक्षीस म्हणून दिली. या पैठणीला सोन्याची जर आणि अस्सल हिरे जडलेले आहेत. ही पैठणीला जिंकल्यावर वहिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. महिला वर्गात लोकप्रिय असलेला झी मराठी वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम अठरा वर्षाहूनही जास्त काळ महाराष्ट्रातील, देशातील तमाम वहिनींचा सन्मान करत आला आहे. या कार्यक्रमाचं महामिनिस्टर हे पर्व तमाम वहिनींच्या भेटीस आलं आणि प्रचंड गाजलं.
“महा मिनिस्टरच्या या प्रवासात माझ्या बऱ्याच मैत्रिणीसुद्धा झाल्या. हा संपूर्ण प्रवास मला कायम लक्षात राहील. हा अविस्मरणीय अनुभव होता”, अशी प्रतिक्रिया लक्ष्मी यांनी विजयानंतर दिली. 11 लाखांची ही पैठणी ही येवलेमध्ये बनवण्यात आली. मूकबधीर कारागिरांनी ही पैठणी बनवली. त्यामुळे पैठणीची किंमत 11 लाख असली तरी या कारागिरांच्या कुटुंबाला त्यातून रोजगार मिळाला.