मुंबई : मुलगी झाली हो…(Mulgi jhali ho)ही मराठी मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मालिकेतील कलाकार किरण माने (Kiran Mane) यांना या मालिकेतून काढल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे आणि ते काही केल्या कमी होत नाहीये. दररोज वेगवेगळे खुलासे केल जात आहेत. राजकीय पोस्ट केल्यामुळे मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप केला गेला. मात्र, त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून दररोज याप्रकरणाला वेगळे वळण मिळते आहे.
किरण मानेंची नवी पोस्ट व्हायरल
व्यावसायिक कारणांमुळे किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आल्याचा दावा मालिकेच्या निर्मात्यांनी केला. राजकीय भूमिका घेतली म्हणून त्यांना मालिकेतून काढले गेले, अशी खोटी बातमी किरण मानेंनी पसरवली, अशा गंभीर आरोप मालिकेतील कलाकारांनी या अगोदरच केला आहे. मुळात त्यांच्या वर्तवणुकीमुळे प्रोडक्शन हाऊसने त्यांना या मालिकेतून काढले असल्याचे कलाकरानी सांगितले. इतकेच नव्हेतर किरण माने यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप देखील करण्यात आले. त्यानंतर परत आता किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
काय म्हटले आहे पोस्टमध्ये वाचा सविस्तर!
किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “महीलांशी गैरवर्तन करत होता तोSSS महिलांशी गैरवर्तSSSन… म्हणजे दूसरं काय अशणाSर? ‘तसलंच’ काहीतरी अशणार !!!” प्रद्युम्न जोरजोरात किंचाळत होता… मानसोपचार तज्ञ प्रसन्न सहस्त्रबुद्धे आणि त्यांच्या सहकार्यांनी त्याचे हातपाय घट्ट धरून ठेवले… काॅटला बांधले… शेवटचा पर्याय म्हणून त्याला शाॅक दिला ! …”डाॅक्टर काय झालंय माझ्या पदूला? गेले दहा दिवस शाखेत जाणं टाळतोय. फक्त ‘कोण हा फडतूस किरण माने? काळं कुत्रं तरी विचारतं का त्याला?’ असं म्हणत मोबाईलमध्ये सतत ‘किरण माने’ असं टाईपत सर्च करत असतो..त्याला बरा करा हो!” असं म्हणून तोंडात पदराचा बोळा कोंबुन प्रद्युम्नची आई ढसाढसा रडू लागली…
डाॅ. प्रसन्न सहस्त्रबुद्धे त्यांना पाणी देत म्हणाले,”हे बघा. रडू नका नक्की झालं काय? हे सविस्तर सांगा.”…प्रद्युम्नचे बाबा सांगू लागले. “अहो ‘किरण मानेंचे महिलांशी गैरवर्तन’ अशी हेडलाईन वाचून प्रद्युम्न आणि त्याच्या मित्रमंडळींमध्ये जल्लोष चालला होता. सगळे म्हणाले “आता सापडला बेटा ! आमच्या विचारधारेशी पंगा घेणं सोपं नाही.. भलेभले संपवलेत आम्ही. रस्त्यावर आणूया साल्याला.”… डाॅक्टर हलकंसं हसले आणि म्हणाले, “हम्..पुढे बोला.”… “तर जेव्हा त्या तीन महिलांच्या तक्रारी सुरू झाल्या.. तेव्हा प्रद्युम्न,चिन्मय,तन्मय,केशव,वेदांत सगळे घरी जमले..फटाके वगैरे आणले..टीव्हीवर त्या महिला सांगू लागल्या की “किरण माने स्वत:ला हिरो समजायचा.”..
तन्मय वैतागून म्हणाला,”अगं होताच तो हिरो… तू पुढे मुद्याचं बोल.”.. नंतर त्या तिघींचे आरोप सुरू झाले… “आम्हाला टोमणे मारायचा.. ॲरोगन्ट वागायचा… वगैरे वगैरे..” प्रद्युम्न आणि मंडळींची चुळबूळ सुरू झाली..”मुद्याचं कुणीच बोलेना रे ! आपण इयत्ता पाचवी ड मध्ये अशा तक्रारी करायचो.” … तेवढ्यात हिराॅईन म्हणाली,”मला अपशब्द वापरायचा.”… प्रद्युम्न आणि गॅंग सरसावून बसली… पण ती त्यापुढे काही सांगेचना ! “अगं… अपशब्द वापरत होता तर त्याला त्याचवेळी थोबाडला का नाही त्याचवेळी??? पोलीस कम्प्लेन्ट का नाही केली ?? शेजारी ज्या वयोवृद्ध लढवय्या अभिनेत्री उभ्या आहेत त्या हे सगळं ऐकून कसं घेत होत्या?? या महिलांसाठी त्या वर्षभर स्टॅंड का घेत नव्हत्या??? आणि मग हे सांगायला पन्नास तास का लावले????तोवर किरण माने फेमस झाला ना.. छ्या!! काही दमच नाही रे आरोपांमध्ये…” असे अनेक प्रश्न चिन्मतन्मयप्रद्युम्न गॅंगला सतावू लागले… मुलाखत संपली.
नैराश्याचं वातावरण पसरलं.. तेवढ्यात शाखेच्या ग्रुपवर मेसेज आला… “ठीक आहे.
ठोस काही हाती लागलं नाही. तरीही यावर आपण किरण मानेला बदनाम करत राहू. लागा कामाला..खाडखाडखाडखाड फेक अकाऊंटस् उघडली गेली.. प्रोफाईल लाॅक चार चार वेळा चेक केलं… आणि सुरू झालं…”किरण्या तुझा बाजार उठला रे…तोवर संध्याकाळी ‘मुलगी झाली हो’ मध्ये काम करणार्या चार महिला टी.व्ही. वर आल्या आणि “किरण माने हा माणूस म्हणून अतिशय भला आहे. काडीचंही गैरवर्तन नाही. आमच्यावर मुलीसारखी माया करतात ते..” असं बोलू लागल्या आणि प्रद्युम्नमित्रमंडळींवर मोठ्ठा बाॅंब पडला… मेंदूवर आघात झाला… तन्मय म्हणाला, “च्यायला एक प्लॅन सक्सेसफुल होईना झालाय. आधी म्हणाले व्यावसायिक कारणामुळे काढलंय..नंतर म्हणाले महिलांशी गैरवर्तन..नंतर म्हणाले टाॅन्टिंग..आणि आता ते ही फसलं…”
…तन्मय हे बोलत असतानाच प्रद्युम्न चिन्मयच्या अंगावर कोसळला…चिन्मय चेंगरलाच.. कसातरी त्याला उचलुन हाॅस्पीटलमध्ये आणला… आणि…डाॅ. प्रसन्न सहस्त्रबुद्धे गोड माणूस ! ते प्रसन्न हसले. स्वत:शी म्हणाले “‘द्वेष’ हे सगळ्या अस्वस्थतेचं,चिंतेचं आणि त्यातून येणार्या विकृतीचं मूळ आहे… जातीद्वेष असो…धर्मद्वेष असो..वा व्यक्तीद्वेष असो… त्या विकृतीतून सुरू होते अर्वाच्य शिवीगाळ.. आणि याचं टोक म्हणजे कपट कारस्थान.. आणि याचा शेवट वैफल्य… उदासिनता.. मानसिक आरोग्याची हानी !!’द्वेष करणं’ म्हणजे स्वत: विष पिणं..आणि आपल्या शत्रूनं मरावं अशी अपेक्षा करणं !!!”…शुद्धीवर आलेल्या प्रद्युम्नच्या डोळ्यांत पाणी आलं… “तसा बरा ॲक्टर आहे किरण माने… पण…” पुन्हा मनात ‘त्या’ विचारांनी थैमान घातले… पुन्हा तो ओरडू लागला… डाॅक्टरांनी त्याच्याकडे धाव घेतली…..अशा प्रकारची पोस्ट किरण माने यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
किरण माने या सोंगाड्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्याचा बोलविता धनी कोण?, चित्रा वाघ संतापल्या
माझ्यावर आरोप करणाऱ्या महिला कलाकार भाजप आणि मनसेशी संबंधित, किरण माने यांचा नवा दावा
(Mulgi jhali ho series Actor Kiran Mane’s new Facebook post goes viral)