Rang Maza Vegla: आता ही असेल ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील नवी कार्तिकी
या मालिकेत कार्तिकीची (Kartiki) भूमिका साकारणारी बाल कलाकार साईशा भोईर (Saisha Bhoir) हिने नुकतीच मालिका सोडली. साईशाच्या आईवडिलांनी इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत त्यामागचं कारण सांगितलं होतं.
स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) या मालिकेत कार्तिकीची (Kartiki) भूमिका साकारणारी बाल कलाकार साईशा भोईर (Saisha Bhoir) हिने नुकतीच मालिका सोडली. साईशाच्या आईवडिलांनी इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत त्यामागचं कारण सांगितलं होतं. या मालिकेत दीपा आणि कार्तिक यांच्या दोन्ही मुली म्हणजेच दीपिका आणि कार्तिकी या चांगल्याच प्रकाशझोतात आल्या आहेत. साईशाने मालिका सोडल्यानंतर आता मालिकेत कार्तिकीची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र आता त्याचं उत्तर मिळालं आहे. बालकलाकार मैत्रेयी दाते कार्तिकीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मैत्रेयीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे. मैत्रेयीची ही आवड लक्षात घेऊन तिच्या पालकांनी अभिनय अकादमीमध्ये तिचा प्रवेश घेतला. मैत्रेयीने बऱ्याच जाहिराती आणि बालनाट्यांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबतच मैत्रेयी शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेत असून तिला चित्रकलेचीही आवड आहे.
मैत्रेयीची ‘रंग माझा वेगळा’ ही आवडती मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र तिच्या ओळखीचं आहे. कार्तिकी आणि दीपिकाची जोडी तर तिला खूपच आवडते. आपलं आवडीचं पात्र साकारायला मिळणार हे कळल्यावर तिला अतिशय आनंद झाला. सेटवरही मैत्रेयीचं खास स्वागत करण्यात आलं. दीपिकाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या चिमुकल्या स्पृहासोबत तर तिची पहिल्या दिवासापासून छान गट्टी जमली आहे. शूटिंगमधल्या फावल्या वेळेत अभ्यास आणि मनसोक्त खेळणं हा त्यांचा दिनक्रम झाला आहे. त्यामुळे मैत्रेयीसाठी हा मालिकेचा सेट नसून दुसरं घरच आहे. पडद्यामागची दोघींची ही खास मैत्री आता प्रेक्षकांना पडद्यावरही पहायला मिळणार आहे. रंग माझा वेगळा ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
पहा मालिकेचा प्रोमो-
View this post on Instagram
साईशाने का सोडली मालिका?
“स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा या मालिकेत साईशा आता दिसणार नाही. जरी ती मालिकेतून दिसणार नसली तरी सोशल मीडियाद्वारे ती तुमच्या भेटीला येईल. कार्तिकीच्या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. आम्ही कल्याणला राहतो आणि मालिकेचं शूटिंग मालाडला होतं. दररोज प्रवासात दोन-अडीच तास लागतात. त्यामुळे तिला शाळा आणि अभ्यासासाठी फार वेळ देता येत नाही. तिच्या तब्येतीवरही परिणाम होऊ लागला”, असं साईशाच्या आई-वडिलांनी सांगितलं.