‘पंड्या स्टोअर’ (Pandya Store) या मालिकेत रिषिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिमरन बुधरुप (Simran Budharup) हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या (rape threats) येत असल्याचा खुलासा केला. मालिकेतील भूमिकेमुळे तिला सोशल मीडियावर अगदी 13 ते 14 वर्षांच्या मुलांकडूनही धमक्या येत असल्याचं सांगितलं. अखेर सिमरनने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. मालिका किंवा चित्रपटातील एखाद्या भूमिकेमुळे कलाकारांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र या ट्रोलिंगच्याही पुढे जाऊन जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्याने सिमरनने कायदेशीररित्या हे प्रकरण हाताळण्याचा विचार केला.
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “माझी नकारात्मक भूमिका असल्याने अशा प्रकारच्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागेल याची मनाची तयारी मी आधीच केली होती. पंड्या स्टोअर मालिकेतील रावी आणि देव यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. पण माझ्या व्यक्तीरेखेने त्यांचं नातं तोडलं. हे लोकांना इतकं खटकलं की ते सोशल मीडियाद्वारे मला धमक्या देऊ लागले. अखेर मी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ती 13-14 वर्षांची मुलं होती. पालकांनी त्यांना शिक्षणासाठी फोन दिला होता, मात्र ते त्याचा वापर दुसऱ्याच कारणासाठी करत होते.”
पालकांनी त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, असं ती यावेळी म्हणाली. “अशा वयात असताना पालकांनी त्यांच्या मुलांवर विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे. काय योग्य आणि अयोग्य हे त्यांना फारसं कळत नाही. जेव्हा मी असे वाईट कमेंट्स वाचते, तेव्हा मला त्या मुलांविषयी वाईट वाटतं. मी माझ्या आयुष्यात खूश आहे, पण मला त्यांच्याविषयी वाईट वाटतं. मला त्यांच्याच वयाइतकी बहीण आहे. जर तिने असं काही केलं असतं तर मी काय केलं असतं मलाच ठाऊक नाही.”