बावधनच्या बगाड यात्रेतील 134 जण कोरोना पॉझिटिव्ह, साताऱ्यात मालिकांची शूटिंग बंद
वाई तालुक्यातील बावधन या गावात प्रशासनाने घालून दिलेले कोव्हिडविषयक नियम डावलून ग्रामस्थांनी रंगपंचमीच्या दिवशी बगाड यात्रा साजरी केली होती (Satara Bavdhan Bagad Yatra Corona )
सातारा : सातारा जिल्ह्यात बावधनच्या बगाड यात्रेमुळे कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. आतापर्यंत 134 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सातारा जिल्ह्यात कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे सर्व मालिकांचे चित्रिकरणही बंद करण्यात आले आहे. देवमाणूस, घेतला वसा टाकू नको, आई माझी काळुबाई यासारख्या मालिकांचे शूटिंग बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. (Satara Bavdhan Bagad Yatra Corona Patients Increase Marathi Serial Shooting stopped)
सातारा जिल्ह्यात दोन एप्रिलला पार पडलेल्या बावधनच्या बगाड यात्रेपासून आतापर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढच होत आहे. आतापर्यंतचा आकडा 134 च्या पार गेला असून अजूनही बावधन गावात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती कायम आहे. विशेष म्हणजे बावधनच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी याआधीच कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या यात्रेच्या बंदोबस्तात असणारे काही पोलीस कर्मचारी आणि पोलीस उपनिरिक्षकही कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं होतं.
कोरोना नियम डावलून बगाड यात्रा
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या गावात प्रशासनाने घालून दिलेले कोव्हिडविषयक नियम डावलून ग्रामस्थांनी रंगपंचमीच्या दिवशी बगाड यात्रा साजरी केली होती. या यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक एकत्र आले होते. यात्रा झाल्यापासून गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. बावधन गावाच्या आजूबाजूच्या वाघजाईवाडी, पांढरेचीवाडी, म्हातेकरवाडीमध्येही कोरोनाचा आकडा वाढला आहे.
साताऱ्यातील मालिकांची शूटिंग बंद
सातारा जिल्ह्यात कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे सर्व मालिकांचे चित्रिकरण बंद करण्यात आले आहे. झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस, घेतला वसा टाकू नको, स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो, तसेच सोनी मराठी वाहिनीवरील आई माझी काळुबाई या मालिकांचे शूटिंग साताऱ्यात सुरु होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानंतर हे शूटिंग बंद करण्यात आले आहे. (Satara Bavdhan Bagad Yatra Corona )
गेल्या वर्षी आई माझी काळुबाई या मालिकेच्या सेटवर कोरोना स्फोट झाला होता. जवळपास 40 ज्युनिअर आर्टिस्टना कोरोनाची लागण झाल्यानंतर मालिकेचं शूटिंग बंद करण्याची वेळ आली होती. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. दुर्दैवाने त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
सातारा जिल्ह्याची कोरोना स्थिती
सातारा जिल्ह्यात 1260 रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध आहेत. रोजची 200 रुग्णांना रेमडिसिव्हर इंजेक्शनची गरज लागते. सध्या सातारा जिल्ह्यात 10 हजार 575 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
संबंधित बातम्या:
कोरोना आहे की गेला? साताऱ्यातील या तुफान गर्दीचं कारण काय? वाचा सविस्तर
बावधनच्या बगाड यात्रेचं आयोजन महागात पडलं, भाविकांसह बंदोबस्तावरील पोलीस बाधित, 61 जणांना कोरोना
(Satara Bavdhan Bagad Yatra Corona Patients Increase Marathi Serial Shooting stopped)