स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शालिनीचे डावपेच एकीकडे सुरु असताना गौरीदेखील खंबीरपणे या डावपेचांचा सामना करत आहे. शालिनीच्या प्रत्येक षडयंत्रामध्ये तिची साथ देणारी सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे देवकी. देवकीशिवाय शालिनी अपूर्ण आहे. मालिकेतलं हे लोकप्रिय पात्र याआधी अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Minakshi Rathod) साकारत होती. मात्र मीनाक्षी खऱ्या आयुष्यात लवकरच आई होणार आहे. त्यामुळेच प्रसुती रजेवर असल्यामुळे देवकी हे पात्र यापुढे अभिनेत्री भक्ती रत्नपारखी (Bhakti Ratnaparkhi) साकारताना दिसेल.
भक्तीला याआधी प्रेक्षकांनी बऱ्याच मालिकांमध्ये पाहिलं आहे. देवकी हे पात्र साकारण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. या मालिकेत्या एण्ट्रीविषयी सांगताना भक्ती म्हणाली, ‘देवकी हे अतिशय लोकप्रिय पात्र मला साकारायला मिळतंय याचा आनंद तर आहेच मात्र जबाबदारीही वाढली आहे. कारण मीनाक्षीने देवकी हे पात्र अतिशय उत्तमरित्या साकारलं आहे. माझ्यासाठी देवकी साकारणं आव्हानात्मक असेल. सेटवर आमचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे आणि सर्वच सहकलाकारांची मला साथ लाभतेय. देवकीचं पात्र साकारणाऱ्या मीनाक्षीने व्हिडिओ कॉल करुन मला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे माझा उत्साह द्विगुणीत झाला आहे. कोल्हापूरी लहेजा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेय. प्रेक्षकांचं प्रेम या मालिकेवर आणि देवकी या पात्रावर अखंड राहो हीच इच्छा व्यक्त करेन.
सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका रात्री 9.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव मुख्य भूमिका साकारत आहेत. तर अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचीही मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका आहे.