स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर येत्या 2 मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चिमुकल्या स्वराच्या निरागस जगाविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. या मालिकेतील एकेका भूमिकेवरून पडदा उचलण्यात येत आहे. गाण्याची आवड असणारी स्वरा ज्या गायकाच्या प्रेमात आहे त्या सुप्रसिद्ध गायक मल्हारची भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर साकारणार आहे. तर या मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीची एण्ट्री होणार आहे. ही अभिनेत्री आहे प्रिया मराठे (Priya Marathe). प्रिया आजवर अनेक हिंदी-मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिने साकारलेल्या खलनायकी व्यक्तिररेखांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. प्रिया मराठेला खलनायकी व्यक्तिरेखा साकारणं आव्हानात्मक वाटतं. प्रेक्षकांना ज्या व्यक्तिरेखांचा राग येतो त्या साकारताना एक अभिनेत्री म्हणून कस लागतो असं तिला वाटतं. तुझेत मी गीत गात आहे या मालिकेत ती मोनिका ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
या भूमिकेचं वेगळेपण सांगताना प्रिया म्हणाली, “स्टार प्रवाहसोबत मी याआधी जयोस्तुते आणि शतदा प्रेम करावे या मालिका केल्या आहेत. तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या निमित्ताने पुन्हा या लाडक्या वाहिनीसोबत जोडली जाणार आहे. ही म्युझिकल मालिका आहे. म्हणजे अशी कविता जी अनुभवायलाच हवी. मी या मालिकेतही हटके लूकमध्ये दिसेन. पिहू नावाच्या चिमुरडीसोबत माझे बरेचसे सीन आहेत. बालकलाकारांसोबत काम करताना नेहमीच मजा येते. त्यांच्या कलाने आणि त्यांचे मूड सांभाळत काम करावं लागतं. आताची पीढी प्रचंड हुशार आहे. मालिकेतली चिमुकली स्वरा आणि पिहू दोघीही कमाल आहेत. आमची एकमेकांशी छान गट्टी जमली आहे.”
या मालिकेची गोष्ट मुलगी आणि तिच्या बाबांच्या प्रेमावर आधारलेली आहे. बाप-लेकीच्या नात्यात मोनिका या पात्राची नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 2 मे पासून रात्री ९ वाजता ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा:
फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराजनंतर पुढे काय? अखेर मिळालं उत्तर
Sher Shivraj Review: ‘शेर शिवराज’ची दुमदुमणारी गर्जना; बरंच काही शिकवून जातो प्रतापगडाचा रणसंग्राम