कलर्स मराठी वाहिनीवरील ‘लेक माझी दुर्गा’ (Lek Majhi Durga) या मालिकेतून अभिनेत्री वरदा पाटीलची (Varada Patil) अचानक एग्झिट झाली आहे. यामुळे मालिकेच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. वरदाने ही मालिका अचानक का सोडली असा प्रश्न सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहे. यामागचं कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. वरदाच्या जागी मालिकेच्या निर्मात्यांनी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड केली आहे. अभिनेत्री रश्मी अनपट (Rashmi Anpat) आता मालिकेत दुर्गाची भूमिका साकारताना दिसणार आहे. दुर्गाच्या लूकमधील रश्मीचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत.
‘शेवटी जयसिंग आणि दुर्गाचं लग्न पार पडणार. मनोरमासाठी मोठा धक्का! शुभ विवाह विशेष, पाहा लेक माझी दुर्गा जाणीव “ती”च्या अस्तित्त्वाची, दररोज रात्री. 10.30 वा कलर्स मराठीवर आणि कधीही Voot वर,’ असं कॅप्शन देत हा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोच्या कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी वरदाबाबत प्रश्न विचारले आहेत. विशेष म्हणजे अगदी एक दिवसआधीसुद्धा वरदा या मालिकेच्या सेटवरील फोटो पोस्ट करत होती. मग अचानक काय झालं आणि तिने मालिका का सोडली, असे प्रश्न प्रेक्षकांना पडत आहेत. याबद्दल मालिकेतील इतरही कलाकारांनी मौन बाळगलं आहे.
या मालिकेत अभिनेता स्वप्निल पवार हा जयसिंगची भूमिका साकारतोय. 14 फेब्रुवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेद्वारे आई आणि मुलीच्या नात्यापलीकडे समाजामध्ये घडणाऱ्या, चर्चित आणि अतिशय नाजूक विषयाला एका वेगळ्याच प्रकारे प्रेक्षकांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मालिकेमध्ये दुर्गाच्या भावविश्वात कुठेतरी वडिलांकडून तिला तुच्छ दर्जाची वागणूक मिळते, तर दुसरीकडे आईचं भरभरून प्रेम मिळत आहे. दुर्गाला आईच्या प्रेमापेक्षा तिच्या वडिलांच्या डोळ्यातील आग सलतेय. तिच्या या भावविश्वात तिला स्वत:च्या अस्तित्वासाठी का बरं संघर्ष करावा लागतो आहे, का तिला वडिलांकडून झिडकारल जातं आहे याविषयीची कथा यात प्रेक्षकांना पहायला मिळत आहे.