The Kerala Story मध्ये ISIS दहशतवाद्याची भूमिका साकारणाऱ्याला दिवसरात्र लोकांचे मेसेज; म्हणाला..
दहशतवाद्याची भूमिका साकारण्यासाठी कशा पद्धतीने तयारी केली असा प्रश्न विचारला असता त्याने सांगितलं, "मी असंख्य आर्टिकल्स वाचले. मी कॅलिफेट, फॅमिली मॅन यांसारखे चित्रपट आणि सीरिज पाहिले होते. ISIS विषयी अनेक माहितीपट उपलब्ध आहेत, त्यांचा मी अभ्यास केला."
मुंबई : देशभरात वाद सुरू असतानाही ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट कमाईचा 100 कोटींचा जादुई आकडा गाठण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून जोरदार कौतुक होत आहे. यातील चार अभिनेत्री सुरुवातीपासूनच चर्चेत आहेत. मात्र आता चित्रपटात ISIS दहशतवाद्याची भूमिका साकारणारा अभिनेता विजय कृष्णाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो चित्रपटाशी निगडीत अनेक मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाला. ‘द केरळ स्टोरी’ पाहिल्यानंतर अनेकांनी तशा घटना खऱ्याच घडल्याचं सांगण्यासाठी मेसेज केल्याचं विजयने सांगितलं.
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट खऱ्या कथेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. केरळातील महिलांचं इस्लाममध्ये धर्मांतर केल्यानंतर कशापद्धतीने त्यांना ISIS दहशतवादी बनवलं जातं, याची कथा त्यात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील भूमिकेविषयी विजय कृष्ण म्हणाला, “यामध्ये मी इर्शाकची भूमिका साकारली आहे. त्याच्या वयोगटातील असंख्य तरुणांप्रमाणे तो सुद्धा मार्ग भटकला आहे. तो ख्रिश्चन असतो, मात्र इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर तो ISIS या दहशतवादी संघटनेत सामील होतो. आपल्या आयुष्याचा मूळ हेतू सापडल्यासारखं त्याला वाटू लागतं.”
“केरळमधील अनेक लोकांनी मला मेसेज केले आहेत. हे आमच्यासोबत किंवा आमच्या ओळखीच्या लोकांसोबत खरंच घडलंय असं ते सांगत होते. मला त्यांच्यावर विश्वास आहे. एक किंवा दोन व्यक्तीसोबत जरी असं घडलं असेल तरी त्याबद्दल चर्चा झाली पाहिजे”, असं तो पुढे म्हणाला.
View this post on Instagram
दहशतवाद्याची भूमिका साकारण्यासाठी कशा पद्धतीने तयारी केली असा प्रश्न विचारला असता त्याने सांगितलं, “मी असंख्य आर्टिकल्स वाचले. मी कॅलिफेट, फॅमिली मॅन यांसारखे चित्रपट आणि सीरिज पाहिले होते. ISIS विषयी अनेक माहितीपट उपलब्ध आहेत, त्यांचा मी अभ्यास केला.”
“चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मला अनेकांचे मेसेज आले. त्यातला एक मेसेज मला खूप आवडला. त्यात असं लिहिलं होतं की आम्हाला चित्रपट पाहताना तुझा फार राग येत होता, पण एकंदर तुझी प्रोफाइल पाहता तू देवमाणूस वाटतोयस. हे वाचून मी हसलो. जी भूमिका त्यांना आवडली नाही, त्यासाठी ते माझं कौतुक करत होते. रिल आणि रियल यातील फरक त्यांनी नीट समजून घेतला होता”, असंही तो म्हणाला.