लग्नाबाबत ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री स्पष्टच बोलली, ‘माझ्यासाठी ते वाईट स्वप्नासारखं..’
'द केरळ स्टोरी' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अदा शर्मा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. लग्न करण्याची इच्छा नसल्याचं अदाने या मुलाखतीत स्पष्ट सांगितलं आहे.

सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आणि सोशल मीडियावर बरीच चर्चासुद्धा घडवून आणली. या चित्रपटानंतर अदा तिच्या घर खरेदीमुळे चर्चेत आली होती. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने ज्या घरात आत्महत्या केली, त्याच घरात अदा शर्मा राहायला गेली आहे. आता अदा तिच्या लग्नाबद्दलच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता तिने लग्न करणार नसल्याचं म्हटलंय.
“मी लग्नच करू नये असं माझं स्वप्न आहे. लग्नाचं स्वप्न पाहणं म्हणजे माझ्यासाठी वाईट स्वप्नासारखं आहे. मी कोणत्याही नात्याला घाबरत नाहीये. मी ऑनस्क्रीन अनेकदा नवरीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात लग्नाबद्दलची माझी आवडच निघून गेली आहे. माझी इच्छाच होत नाही. पण जर भविष्यात माझे विचार बदलले तर मी अत्यंत आरामदायी कपड्यांमध्ये लग्न करेन. भरजरी लेहंग्यात करणार नाही”, असं ती म्हणाली.




View this post on Instagram
अदा शर्माने हिंदीसोबतच तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलंय. 2008 मध्ये तिने ‘1920’ या हॉरर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘हसी तो फंसी’, ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अदा ‘हार्ट अटॅक’, ‘क्षणम’, ‘S/O सत्यमूर्ती’ यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकली.
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे अदा शर्मा विशेष चर्चेत आली. भारतात कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार करणारा हा महिलाप्रधान भूमिका असलेला पहिला चित्रपट ठरला होता. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं धर्मांतर केल्यानंतर त्यांना कथित ISIS दहशतवादी संघटनेत सामील करून घेतलं गेलं, अशी कथा यामध्ये दाखवण्यात आली होती. त्यामुळे हा चित्रपट ‘इस्लामोफोबिक’ असल्याचीही टीका झाली होती. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्माशिवाय योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बलानी, विजय कृष्ण, प्रणय पचौरी आणि प्रणव मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. सुदिप्तो सेन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून विपुल शाह त्याचे निर्माते आहेत.