The Kerala Story | “हा माझा शेवटचा चित्रपट”; ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्मा असं का म्हणाली?
"अशा संधीसाठी मला 'ओम शांती ओम'मधल्या शाहरुख खानसारखा पुनर्जन्म घ्यावा लागेल की काय, असा विचार मी करायचे. पण या चित्रपटाच्या माध्यमातून मला जी संधी मिळाली, त्यासाठी मी खूप खुश आहे", अशा शब्दांत अदा शर्माने समाधान व्यक्त केलं.
मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. यामध्ये मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री अदा शर्माच्या कामगिरीचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक होत आहे. हे सर्वकाही स्वप्नवत असल्याची प्रतिक्रिया अदाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली. याच मुलाखतीत अदा विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाली. अदाने बॉलिवूडमध्ये याआधीही काही चित्रपटांमध्ये काम केलंय, मात्र ‘द केरळ स्टोरी’मुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली आहे.
‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत अदा म्हणाली, “प्रत्येक चित्रपट केल्यानंतर हा माझा शेवटचा चित्रपट असेल असा विचार मी करायचे. कारण यानंतर मला पुन्हा संधी मिळेल की नाही हे मला माहीत नव्हतं. पुन्हा कोणी माझ्या कामावर विश्वास ठेवेल का, हे मला कळत नव्हतं. पण कदाचित माझ्यापेक्षा प्रेक्षकांचं माझ्यासाठीचं स्वप्न खूप मोठं आहे. अदाला ही किंवा ती भूमिका मिळायला पाहिजे, असं ते नेहमी म्हणतात. आता ते सर्व स्वप्न सत्यात उतरले आहेत. मी खूप नशीबवान आहे.”
“‘द केरळ स्टोरी’ला इतका चांगला प्रतिसाद मिळेल याची कल्पनासुद्धा केली नव्हती. माझी स्वप्नं नेहमीच खूप छोटी-छोटी होती. मला चांगल्या भूमिका साकारायच्या होताय, पण त्या भूमिका मला कितपत मिळतील हे माहीत नव्हतं”, असं ती पुढे म्हणाली. यावेळी ती घराणेशाहीबद्दलही व्यक्त झाली. “मला वाटतं की मी खूप नशीबवान आहे. मी या यशाचं कधी स्वप्नच पाहिलं नव्हतं. इंडस्ट्रीतून नसलेल्या एखाद्या सामान्य मुलीसाठी हे सर्व शक्य नाही असं मला वाटत होतं. पण आता मलासुद्धा प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय”, अशा शब्दांत तिने आनंद व्यक्त केला.
View this post on Instagram
“इतके लोक थिएटरमध्ये येऊन माझा चित्रपट पाहत आहेत, ही माझ्यासाठी अत्यंत भावूक गोष्ट आहे. आमची स्वप्नं सत्यात उतरली आहेत. मुलींमध्ये जागरुकता पसरवावी, या हेतूने आम्ही हा चित्रपट बनवला. इतके लोक थिएटरमध्ये येऊन चित्रपट पाहत असल्याने, मला त्याचं समाधान वाटतंय. जी गोष्ट इतकी वर्षे लपवून ठेवली होती, ती आता लोकांसमोर आली आहे”, असं तिने सांगितलं.
“एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून आपलं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मला ती संधी मिळाली, यासाठी मी कृतज्ञ आहे. अशा संधीसाठी मला ‘ओम शांती ओम’मधल्या शाहरुख खानसारखा पुनर्जन्म घ्यावा लागेल की काय, असा विचार मी करायचे. पण या चित्रपटाच्या माध्यमातून मला जी संधी मिळाली, त्यासाठी मी खूप खुश आहे”, अशा शब्दांत अदा शर्माने समाधान व्यक्त केलं.