‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या आईने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; भावनिक पोस्टने वेधलं लक्ष
अभिनेत्री अमृता फडकेच्या आईने दुसऱ्यांदा लग्न
मुंबई : 12 डिसेंबर 2023 | ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत मानसी वहिनीची भूमिका साकारलेली अभिनेत्री अमृता फडकेची आई स्मिता फडके नुकत्याच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल्या आहेत. अमृताने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. आईला लग्नाच्या शुभेच्छा देत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. ‘उत्तम लाइफ पार्टनर मिळावा, असावा अशी सगळ्यांचीच मनापासूनची इच्छा असते. पण तसं वाटणं, तसं मिळणं आणि घडणं हे प्रत्येकाच्याच नशिबी असतंच असं नाही. पण आई तुला ही संधी देवाच्या कृपेने पुन्हा मिळतेय आणि तेही तुझ्या दुसऱ्या इनिंगच्या टप्प्यावर’, अशा शब्दांत अमृताने आनंद व्यक्त केला.
स्मिता फडके यांनी 8 डिसेंबर रोजी शिरीष केळकर यांच्याशी लग्नगाठ बांधली. आईच्या लग्नाविषयी अमृताने पुढे लिहिलं, ‘खूप वर्षांपासून बाबा म्हणून हाक मारायला आणि ती जागा घ्यायला कोणीतरी असावं अशी मनापासूनची इच्छा होती आणि माझ्या आयुष्यात हा शब्द आणि मनात ती जागा करणं सोपं नव्हतं. पण बाबा तू खरंच ती जागा भरून काढू शकतोस ही भावनाही माझ्यासाठी खूप सुखावणारी आहे. तुझ्यामुळे मला प्रेम करायला अजून एक गोड भाऊ आणि एक सुंदर बहीण मिळाली आहे. मनाने खूप श्रीमंत असलेल्या खूप मोठ्या कुटुंबाचा मीही तुझ्यामुळे एक छोटासा भाग झाली आहे. खूप छान वाटतंय’
View this post on Instagram
‘आई, या वयात आणि या टप्प्यावर हा निर्णय घ्यायला खूप हिंमत लागते. त्यासाठी खरंतर दोघांनाही हॅट्स ऑफ. तुमची एकमेकांबरोबरची साथ-सोबत, तुमचा प्रेमाचा धागा अजून पक्का होऊन घट्ट विणला जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना,’ असं तिने या पोस्टच्या शेवटी लिहिलंय. अमृताच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आईनेही दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. ‘तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या,’ अशी भावना सिद्धार्थने त्याच्या आईविषयी व्यक्त केली होती.