Kantara: इन्स्टाग्रामवरील ‘त्या’ पोस्टमुळे मिळाली ‘कांतारा’ची ऑफर; वाचा भन्नाट किस्सा
इन्स्टाग्राममुळे झाली 'कांतारा'च्या हिरोईनची निवड
मुंबई- सध्या सर्वत्र ‘कांतारा’ याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ऋषभ शेट्टी लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. मूळ कन्नड भाषेतील या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून इतर भाषांमध्ये त्याचं डबिंग करण्यात आलं. या चित्रपटाविषयी आणि त्यातील कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्री सप्तमी गौडाने तिच्या निवडीचा किस्सा सांगितला. एका इन्स्टाग्राम पोस्टवरून तिची लीला या भूमिकेसाठी निवड झाली.
सप्तमीने तिच्या निवडीच्या प्रक्रियेलाही दैवी चमत्कार असं म्हटलं आहे. “लॉकडाऊनमध्ये मी कर्नाटक टुरिझमवर एक व्हिडीओ केला होता. आम्ही मैसूरमधील चामुंडी बेट्टावर गेलो होते. तिथलाच एक फोटो मी इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. तोच फोटो ऋषभ सरांनी पाहिला. ते मला इन्स्टाग्रामवर फॉलोसुद्धा करत नव्हते, पण त्यांना त्यांच्या फीडमध्ये माझा फोटो दिसला. त्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला”, असं तिने सांगितलं.
View this post on Instagram
कांतारा या चित्रपटात ऋषभ आणि सप्तमीसोबतच किशोर, अच्युत कुमार यांच्याही भूमिका आहेत. जगभरात या चित्रपटाची कमाई जवळपास 325 कोटी रुपये इतकी झाली आहे. कन्नड भाषेत चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दोन आठवड्यांनंतर इतर भाषांमधील डबिंग व्हर्जन प्रदर्शित करण्यात आले.
कांताराच्या हिंदी व्हर्जननेही 53 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पाचव्या आठवड्यात या चित्रपटाने केजीएफ 2 चा तर सहाव्या आठवड्यात ‘उरी’ या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.