Urfi Javed: ‘संजय आठवतोय का?’; उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांच्यावर पुन्हा हल्लाबोल
उर्फी जावेद-चित्रा वाघ यांच्यातील वाद पेटला; अभिनेत्रीने आता थेट संजय राठोडसोबतच्या मैत्रीचा केला उल्लेख
मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर न्युडिटी पसरवल्याच्या आरोपाखाली चित्रा वाघ यांनी उर्फीच्या अटकेची मागणी केली आहे. तिच्याविरोधात त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. या तक्रारीवर आता उर्फीची प्रतिक्रिया समोर आली आहे. उर्फीने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रा वाघ यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. यावेळी तिने आता शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांचा उल्लेख केला आहे.
उर्फीने तिच्या या पोस्टमधून चित्रा वाघ यांना संजय राठोड प्रकरणाची आठवण करून दिली आहे. ‘ही तीच महिला आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संजय राठोडच्या अटकेसाठी ओरडत होत्या. त्यानंतर लाच घेतल्यामुळे त्यांचा पती निशाण्यावर आला. पतीला वाचवण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर संजय आणि चित्राजी एकमेकांचे चांगले मित्र बनले. मीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर आम्ही दोघीसुद्धा चांगल्या मैत्रिणी होऊ’, असा उपरोधिक टोला तिने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लगावला.
Can’t wait to be best friends with @ChitraKWagh after I join bjp . Remember Sanjay Chitra ji ? Aapke bjp join karne k baad Aapki toh badi dosti ho gyi thi k aap unki Saari galtiya bhool gyi thi jiske liye ncp me itna halla kiya tha!
— Uorfi (@uorfi_) January 3, 2023
ट्विटरवरही तिने चित्रा वाघ आणि संजय राठोड यांच्याविषयी ट्विट केलं. ‘चित्रा वाघ यांची खास मैत्रीण बनण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. चित्राजी तुम्हाला संजय आठवतोय का? तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तुमच्या दोघांची चांगली मैत्री झाली. त्यांच्या ज्या चुकांविरोधात तुम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना हल्लाबोल केला होता, त्या सर्व तुम्ही आता विसरला आहात’, असं तिने म्हटलंय. ‘आपण लवकरच खास मैत्रिणी होणार आहोत चित्रू’, असंही ट्विट तिने केलंय.
We are going to be besties soon chitruuuu! https://t.co/82YhfGIkkj
— Uorfi (@uorfi_) January 3, 2023
शिवसेना नेते संजय राठोड हे 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र सरकारमध्ये वनमंत्री होते. 2021 मध्ये त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूचा आरोप त्यांच्यावर होता. पूजाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यावेळी भाजपने हे प्रकरण उचलून धरत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.