अंकिता-सुशांतच्या नात्याबद्दल अखेर पती विकी जैनने सोडलं मौन; म्हणाला..
बिग बॉसच्या घरात अभिनेत्री अंकिताने अनेकदा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं नाव घेतलं. सुशांत आणि अंकिता जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते. आता अंकिताने सुशांतचं नाव सतत घेण्यावरून तिचा पती विकी जैनने प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : 30 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’च्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांनी एकत्र एण्ट्री केली होती. मात्र घरात आल्यानंतर या दोघांमध्ये सतत भांडणं होताना दिसली. या शोदरम्यान अंकिताने अनेकदा अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख केला होता. प्रेक्षकांकडून सहानुभूती मिळावी, यासाठी ती सुशांतबद्दल बोलायची, असा आरोप अनेकांनी केला. यामध्ये खुद्द अंकिताच्या सासूचाही समावेश होता. अंकिता आणि सुशांत जवळपास सहा ते सात वर्षे एकमेकांना डेट करत होते. टेलिव्हिजनवरील ही सर्वांत लोकप्रिय जोडी होती. या दोघांच्या नात्याविषयी अखेर विकी जैनने मौन सोडलं आहे. बिग बॉसच्या घरात अंकिताने सतत सुशांतचं नाव घेतल्यावरून विकीने प्रतिक्रिया दिली आहे.
‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत विकी त्याच्या बिग बॉसच्या प्रवासाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. “नात्यात बऱ्याचदा काही गोष्टी घडतात. ज्यासाठी आपण कधीच तयार नसतो. अशा परिस्थितीत तुम्ही एकमेकांना कशाप्रकारे पाठिंबा देता, त्यावरून तुमचं नातं अधिक घट्ट होत जातं. अंकिता आणि सुशांत यांचं नातं कसं होतं, हे मला नीट ठाऊक आहे. मला त्यांच्याविषयी सगळं माहीत होतं आणि त्यांचं नातं फार सकारात्मक होतं. त्यामुळे मला त्या गोष्टीने काही फरक पडत नाही. मी फार प्रॅक्टिकल विचार करणारा आहे. सध्याच्या घडीला प्रॅक्टिकल असणं खूप गरजेचं असतं. कारण अशा गोष्टी घडत असतात. अंकिताच्या मनात सुशांतविषयी काय भावना आहेत, हे मला माहीत आहे. त्यामुळे अशा गोष्टींमुळे माझ्या मनात कधीच असुरक्षिततेची भावना येत नाही.”
जून 2020 मध्ये सुशांत मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. याच मालिकेत एकत्र काम करता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अंकिता आणि सुशांत हे जवळपास सहा ते सात वर्षे एकमेकांना डेट करत होते. बिग बॉसच्या घरात अंकिताकडून सतत होणाऱ्या सुशांतच्या उल्लेखाबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले. त्यावर अंकिताच्या आईनेही एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत वंदना लोखंडे म्हणाल्या होत्या, “सुशांतचं नावं घेणं म्हणजे अंकिताची कोणती स्ट्रॅटेजी किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी नाही. ते दोघं जवळपास आठ वर्षे सोबत होते आणि सुशांतसोबत अंकिताने तिच्या आयुष्यातील एका टप्प्याचा प्रवास केला आहे. ब्रेकअपनंतरही ती नेहमीच सुशांतच्या भल्यासाठी विचार करायची. त्यामुळे जेव्हा सुशांतचं निधन झालं, तेव्हा ती पूर्णपणे खचली होती. कारण त्या दोघांमध्ये तसंच नातं होतं.”