गौरीसोबत आमिर खानच्या रिलेशनशिपबद्दल विक्रम भट्ट स्पष्टच म्हणाला..
आमिर खानच्या रिलेशनशिपबद्दल दिग्दर्शिक विक्रम भट्टने मत मांडलंय. गेल्या अठरा महिन्यांपासून आमिर खान हा गौरी स्प्रॅटला डेट करतोय. आपल्या साठाव्या वाढदिवशी त्याने पापाराझींसमोर याचा खुलासा केला होता.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. आपल्या 60 व्या वाढदिवशी त्याने त्याचं रिलेशनशिप जाहीर केलं. पापाराझींसमोर त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची सर्वांना ओळख करून दिली. दोनदा घटस्फोट झाल्यानंतर वयाच्या 60 व्या वर्षी रिलेशनशिपमध्ये आलेल्या आमिरबद्दल ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आमिरची गर्लफ्रेंड गौरी ही बेंगळुरूची असून तिला सहा वर्षांचा मुलगासुद्धा आहे. हे दोघं गेल्या वीस वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. मात्र गेल्या 18 वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत. यावर आता प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत विक्रम भट्ट म्हणाले, “हे पहा, जर मी वयाच्या 50 व्या वर्षी लग्न करू शकतो, तर आमिर वयाच्या 60 व्या वर्षी पार्टनर का नाही शोधू शकत? वय हा केवळ आकडा आहे. आनंद शोधण्यासाठी वयाचं बंधन नसतं. जसजसं आयुष्य पुढे सरकतं, तसतसं रिलेशनशिपमधील उत्साह आणि लैगिकता या गोष्टी कमी महत्त्वाच्या ठरतात. नंतरच्या काळात नात्यातील समजुतदारपणा, दूर केला जाणारा एकटेपणा, एकमेकांना दिलेली साथ या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपला हात हातात घेणारी, आपल्याला समजून घेणारी, सर्वकाही ठीक होईल असं सांगणारी व्यक्ती या टप्प्यात हवी असते. त्यामुळे अशी व्यक्ती भेटल्याबद्दल मी आमिरसाठी खूप खुश आहे. तो खूप चांगला माणूस आहे. त्याला त्याच्या वाट्याचा आनंद मिळालाच पाहिजे.”




View this post on Instagram
आमिर खानने याआधी दोन वेळा लग्न केलं होतं. त्याने रिना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं. रिना आणि आमिरला जुनैद आणि आयरा ही दोन मुलं आहेत. रिनाला घटस्फोट दिल्यानंतर आमिरने किरण रावशी दुसरं लग्न केलं होतं. किरण आणि आमिरला आझाद हा मुलगा आहे. 2021 मध्ये आमिर आणि किरण यांनी अधिकृतरित्या विभक्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. गर्लफ्रेंड गौरीबद्दल आमिर म्हणाला, “मी एका अशा व्यक्तीच्या शोधात होतो, जिच्यासोबत मी शांतपणे राहू शकतो, जी माझ्या आयुष्यात शांती घेऊन येईल. गौरी ही तीच व्यक्ती आहे.” आमिरने गौरीची ओळख त्याच्या कुटुंबीयांशी आणि बॉलिवूडमधल्या खास मित्रांशी म्हणजेच शाहरुख खान आणि सलमान खानशी करून दिली आहे.