Virat Anushka: विराटने ज्या कंपनीतून कमावले 110 कोटी रुपये; त्याच कंपनीवर भडकली अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माच्या फोटोवरून वाद; विराटलाही करावी लागली मध्यस्ती, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
मुंबई: क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता एका ब्रँडने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमुळे हे दोघं पुन्हा चर्चेत आले आहेत. ‘पुमा’ या ब्रँडने परवानगी न घेता त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनुष्काचा फोटो पोस्ट केला. त्यामुळे नाराज झालेल्या अनुष्काने संबंधित कंपनीला फोटो काढून टाकण्यास सांगितलं. विशेष म्हणजे, अनुष्काने ज्या ‘पुमा’ कंपनीविरोधात नाराजी व्यक्त केली, त्याचा विराट कोहली ब्रँड ॲम्बेसेडर आहे. विराटनेसुद्धा ‘पुमा इंडिया’कडे ही समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.
विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अनुष्काच्या स्टोरीचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं की पुमा इंडियाने ही समस्या लवकरात लवकर सोडवावी. अनुष्काने पुमा इंडियाला टॅग करत लिहिलं होतं, ‘माझ्या परवानगीशिवाय तुम्ही कोणत्याही ब्रँडच्या प्रसिद्धीसाठी माझा फोटो नाही वापरू शकत. मी तुमच्या कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर नाही, त्यामुळे हा फोटो काढून टाकावा.’
पुमा इंडियाने त्यांच्या सिझन सेलसाठी अनुष्काच्या फोटोचा वापर तिच्या परवानगीशिवाय केला, असा आरोप आहे. याच गोष्टीमुळे अनुष्का नाराज आहे. अनुष्काच्या तक्रारीनंतर ‘पुमा’कडूनही उत्तर देण्यात आलं आहे. मात्र या उत्तरामुळे कदाचित ही सर्व मार्केर्टिंग स्ट्रॅटेजी असू शकतं, असंही म्हटलं जातंय. कंपनीच्या नावाची चर्चा घडवून आणण्यासाठी अशा पद्धतीची कॉन्ट्रोव्हर्सी तयार केली, असं काही नेटकरी म्हणत आहेत.
So here’s the official announcement. Anushka Sharma will be the brand ambassador of Puma ? pic.twitter.com/1CWQFSyjJv
— feryy (@ffspari) December 19, 2022
‘आम्ही तुझ्याशी आधीच संपर्क साधायला हवा होता. आता आपण या गोष्टी पुढे नेऊयात का’, अशी पोस्ट पुमा कंपनीकडून लिहिण्यात आली. इतकंच नव्हे तर पुमा आणि अनुष्काच्या कराराचा एडीट केलेला फोटोसुद्धा त्यांनी गंमत म्हणून पोस्ट केला आहे.
पुमासोबत विराट कोहलीचा 110 कोटींचा करार
विराट कोहली हा 2017 पासूनच पुमा इंडियाचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. या कंपनीने विराटला 8 वर्षांसाठी 110 कोटी रुपयांना साइन केलं होतं. म्हणजेच विराटला पुमा इंडियाकडून दरवर्षी 13.75 कोटी रुपये मिळणार. हा करार 2025 मध्ंये संपुष्टात येणार आहे.