The Kashmir Files | ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका करणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांच्यावर भडकले विवेक अग्निहोत्री
काही दिवसांपूर्वी नसीरुद्दीन शाह यांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर टीका केली होती. त्यावर आता विवेक अग्निहोत्री यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भारताला नकारात्मक पद्धतीने दाखवलेलंच त्यांना आवडतं, असं अग्निहोत्री म्हणाले.
मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या त्यांच्या आगामी ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. विवेक अग्निहोत्री त्यांच्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. एकीकडे त्यांच्या या नवीन चित्रपटाची चर्चा आहे. तर दुसरीकडे गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘द काश्मीर फाइ्ल्स’ या चित्रपटाचा वाद अद्याप शमला नाही. आता नुकतंच ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर टिप्पणी केली होती. त्यावर आता अग्निहोत्रींची प्रतिक्रिया समोर आली आहे.
विवेक अग्निहोत्री म्हणाले की, “नसीरुद्दीन शाह यांना फक्त त्याच गोष्टी पसंत येतात, ज्यामध्ये भारताला नकारात्मक पद्धतीने दाखवलं जातं. ते फक्त नकारात्मक विचार करतात आणि नकारात्मक गोष्टीच बघतात. म्हणूनच त्यांना द काश्मीर फाइल्स हा चित्रपट आवडला नाही.”
बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत अग्निहोत्री पुढे म्हणाले, “कोणता चित्रपट चांगला आहे आणि कोणता नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. मी निश्चितपणे हे सांगू शकतो की त्यांना असे चित्रपट आवडत असतील, ज्यामध्ये भारतावर टीका केलेली असेल. काही लोक निराश असतात. ते सतत नकारात्मक बातम्यांमध्ये आणि नकारात्मक गोष्टींमध्ये विश्वास ठेवतात. त्यामुळे मला माहीत नाही की नसीर भाईंना काय आवडतं? मी त्यांच्या अभिनयकौशल्याचा चाहता होतो आणि माझ्या ‘द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटात त्यांनी कामसुद्धा केलं होतं. मात्र आता तेच असं बोलतायत. कदाचित आता ते अधिक वयस्कर झाले आहेत किंवा ते त्यांच्या आयुष्यात खूप त्रस्त आहेत.”
“द काश्मीर फाइल्स या चित्रपटामुळे लोकांना एवढी समस्या का आहे काय माहीत? काश्मीरमध्ये झालेल्या हिंदूंच्या नरसंहारावर त्यांना का पडदा टाकायचा आहे, हे मला कळत नाही. ते समजूतदार लोक आहेत. जर तेच या गोष्टीला नाकारत असतील तर माझ्याकडे पुढे बोलण्यासाठी काही शब्दच नाहीत”, असंही अग्निहोत्री म्हणाले.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी ‘द काश्मीर फाइल्स’, ‘द केरळ स्टोरी’, आणि ‘गदर 2’ यांसारख्या चित्रपटांवर ताशेरे ओढले. असे चित्रपट हिट होताना पाहून खूप त्रास होतो, असं ते म्हणाले होते.