‘तुझ्या कोणत्या चित्रपटांवर बंदी आणायची?’; ‘द केरळ स्टोरी’वरून विवेक अग्निहोत्री नवाजुद्दीनवर भडकले
'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने या चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. त्यावरून 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सिद्दीकीवर निशाणा साधला आहे.
मुंबई : देशभरात वाद झाल्यानंतरही अदा शर्माची मुख्य भूमिका असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये बंदी होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या बंदीला स्थगिती दिली. चित्रपटाच्या बंदीबाबत बॉलिवूडमधल्या काही सेलिब्रिटींनी आपली मतं मांडली. मात्र त्यापैकी नवाजुद्दीन सिद्दिकीच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नवाजुद्दीनवर निशाणा साधला आहे. मात्र काही वेळानंतर त्यांनी हे ट्विट डिलिट केलं. तोपर्यंत सोशल मीडियावर या ट्विटचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले होते.
नवाजुद्दीन काय म्हणाला होता?
“एखादा चित्रपट किंवा कादंबरी जर काही लोकांच्या भावना दुखावत असेल तर हे चुकीचं आहे. आम्ही प्रेक्षकांना किंवा त्यांच्या भावना दुखावण्यासाठी चित्रपट बनवत नाही. जर चित्रपटात लोकांमध्ये दरी निर्माण करण्याची आणि सामाजिक समरसता तोडण्याची ताकद असेल तर हे खूपच चुकीचं आहे. आपल्याला या जगाला जोडायचं आहे, तोडायचं नाही”, असं मत नवाजुद्दीनने ‘द केरळ स्टोरी’बाबत मांडलं होतं. मात्र जेव्हा त्याच्या या वक्तव्यावरून ट्रोलिंगला सुरुवात झाली, तेव्हा त्याने माध्यमांना दोष दिला.
‘फक्त काही व्ह्यूज आणि हिट्स मिळवण्यासाठी कृपया खोटी बातमी पसरवणं थांबवा. याला ‘चीप टीआरपी’ (स्वस्तात मिळवलेली प्रसिद्धी) म्हणतात. कोणत्याही चित्रपटावर कधीही बंदी आणली जावी असं मी म्हणालोच नाही. चित्रपटांवर बंदी आणणं थांबवा, खोट्या बातम्या पसरवणं थांबवा’, असं त्याने ट्विट केलं होतं.
विवेक अग्निहोत्रींनी साधला निशाणा
बंदीबाबतच्या नवाजुद्दीनच्या वक्तव्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केलं. ‘अनेक भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबीयांना ओटीटीवरील शोज आणि चित्रपटांमध्ये विनाकारण हिंसा, शिवीगाळ आणि विकृती दाखवल्याचं वाटतं. यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जातात आणि लहान मुलांवर वाईट परिणाम होतो. अशात नवाजुद्दीन सल्ला देऊ शकतो की त्याचे बहुतांश चित्रपट आणि ओटीटी शोजवर बंदी आणली जावी का? तुझं काय मत आहे,’ असा सवाल त्यांनी केला. मात्र काही वेळानंतर त्यांनी हे ट्विट डिलिट केलं.
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा, सिद्धी इदनानी, योगिता बिहानी आणि सोनिया बलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल याठिकाणी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.