“तुम्ही प्रामाणिक असता पण तुमचा वापर केला जातो तेव्हा..”; ब्रेकअपबद्दल विवेक ओबेरॉय व्यक्त
अभिनेता सलमान खानसोबत ब्रेकअप केल्यानंतर ऐश्वर्या राय ही विवेकला डेट करू लागली होती. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2003 मध्ये विवेक आणि ऐश्वर्याचा ब्रेकअप झाला.
अभिनेता विवेक ओबेरॉयचं खासगी आयुष्य जणू खुल्या किताबासारखंच आहे. अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबतचं त्याचं अफेअर आणि ब्रेकअप हे सर्वांनाच माहीत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. विवेकने 2010 मध्ये प्रियांका अल्वाशी लग्न केलं. हे त्याचं अरेंज मॅरेज होतं. मात्र त्यापूर्वी त्याचं नाव काही अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. त्यापैकी ऐश्वर्यासोबतचं त्याचं अफेअर विशेष चर्चेत होतं. या सर्व गोष्टींमधून काय शिकायला मिळालं आणि वैयक्तिक अनुभव कसा होता, याविषयी विवेकने या मुलाखतीत सांगितलं. यावेळी विवेकने तरुणांना रिलेशनशिपबद्दल सल्लासुद्धा दिला. हृदयभंग किंवा ब्रेकअप झाल्यानंतर आयुष्यभर सिंगल राहण्यासारखे टोकाचे निर्णय घेऊ नका, असं तो म्हणाला.
‘मेन्स एक्सपी’ला दिलेल्या मुलाखतीत विवेकने स्वत:च्या अनुभवातून तरुणांना ब्रेकअपमधून सावरण्यासाठी काही टिप्स दिले. “ब्रेकअप किंवा हृदयभंग झाल्यानंतर सर्वसामान्यपणे तरुण काय करतात? तर त्यांच्या मनात आपली फसवणूक झाल्याची भावना असते, मग ते मित्रांसोबत मद्यपान करू लागतात, एक्स गर्लफ्रेंडवर टीकाटिप्पणी करून ते आपला संताप व्यक्त करतात, त्याला बरं वाटावं म्हणून त्यांचे मित्रसुद्धा यात सहभागी होतात. काही मुलंतर आयुष्यात कधीच लग्न करणार नाही किंवा सिंगलच राहीन अशी टोकाची भूमिका घेतात. तर काहीजण याच्या अगदी विरोधी वागतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक मुलीला ते डेट करतात आणि कोणालाच कमिटमेंट न देण्याचं ठरवतात. मात्र हे सर्व पर्याय चुकीच्या मार्गदर्शनातून तुमच्याकडे पोहोचले आहेत. हे सर्व केल्याने तुम्ही स्वत:मधील प्रामाणिकपणा गमावून बसता”, असं विवेक म्हणाला.
View this post on Instagram
याविषयी त्याने पुढे सांगितलं, “एखाद्या मुलीने तुम्हाला नाकारलं असलं तरी तुम्ही स्वत:ला नाकारू नका. तुम्हाला स्वत:वर अधिक काम करण्याची गरज असते. अर्थात भावना व्यक्त करणं महत्त्वाचं असतं, पण ब्रेकअपनंतर दारू पिणं, अनेक मुलींना डेट करत फिरणं.. हे सर्व चुकीचं आहे. यासाठी बॉलिवूडसुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहे असं मला वाटतं. कारण चित्रपटांमधील हिरो अशाच पद्धतीने वागताना दाखवलं जातं. आपल्या नात्यात नेमकं काय चुकलं हे जाणून ते भविष्यात सुधारण्याचा प्रयत्न करा. मात्र जर तुमची फसवणूक झाली असेल तर काळजी बाळगा. जर त्यात तुमची काहीच चूक नसेल आणि तुमचा वापर केला गेला असेल, तर स्वत:चं संरक्षण करणं महत्त्वाचं असतं. समोरची व्यक्ती त्या लायक नसेल तर तुम्ही स्वत:ला इतकं वाहून घेऊ नका.”
यावेळी विवेकने त्याचा वैयक्तिक अनुभवसुद्धा सांगितला. “ब्रेकअपनंतर आपण सहसा भावनिक प्रतिक्रियेवर लक्ष केंद्रीत करतो. पण स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत नाही. मी जवळपास चार ते पाच वर्षे स्वत:ला भावनांमध्ये वाहून घेतलं होतं. प्रियांका माझ्या आयुष्यात येईपर्यंत सर्वकाही कठीण होतं. मी नकारात्मक मनस्थितीत अडकलो होतो. मी आयुष्यभर सिंगल राहण्याचा निर्णय घेतला होता. माझा मूळ स्वभावच मी विसरून गेलो होतो. मी बदलून स्वत:लाच शिक्षा देत होतो”, अशी कबुली विवेकने दिली.