“मला माझ्या वडिलांसोबत काम करायचं नाही..” असं का म्हणाला होता अक्षय खन्ना?
अभिनेता अक्षय खन्नाने एका मुलाखतीत वडिलांसोबत कधीच काम न करण्याविषयी वक्तव्य केलं होतं. यामागचं कारणसुद्धा त्याने सांगितलं होतं. अक्षयचे वडील विनोद खन्ना हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते.

अभिनेते विनोद खन्ना यांचं 27 एप्रिल 2017 मध्ये निधन झालं. त्यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘अमर अकबर अँथनी’ (1977), ‘मुकद्दर का सिकंदर’ (1978) आणि ‘कुर्बानी’ (1980) यांसारखे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. विनोद खन्ना यांना 2018 मध्ये मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. अभिनयासोबतच त्यांनी राजकारणातही विशेष कामगिरी केली. 2003-2004 मध्ये ते परराष्ट्र राज्यमंत्रीपदावर होते. या अभूतपूर्व कामगिरीनंतरही अद्याप विनोद खन्ना यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनला नाही. त्यांची मुलं अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना, जे स्वत: अभिनेते आहेत, त्यांनीसुद्धा वडिलांच्या बायोपिकचा विचार केला नाही.
2017 मध्ये IANS या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “मी त्याविषयी कधी विचार केला नाही, त्यामुळे मी त्यावर काही सांगू शकत नाही. पण मला वाटतं की बायोपिक हे जितके अचूक असू शकतील तितकं अभिनेत्यासाठी चांगलं असतं असं मला वाटतं. एखादी खऱ्या आयुष्यातील व्यक्तीरेखा साकारणं हे कलाकारासाठी खूप आव्हानात्मक आणि धोकादायक असतं. कारण तुम्ही अशी भूमिका साकारता, जी खरीच अस्तित्त्वात आहे किंवा होती. त्यामुळे ती भूमिका साकारणं खूप अवघड असतं. खऱ्या व्यक्तीरेखा साकारण्यापूर्वी एखाद्याने दहा वेळा विचार करायला हवा.” असं वक्तव्य करणाऱ्या अक्षयने स्वत: ‘माय फादर’ या चित्रपटात महात्मा गांधी यांचे पुत्र हिरालाल गांधींची भूमिका साकारली होती. याशिवाय नुकताच तो ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला होता.
या मुलाखतीत अक्षयने वडील विनोद खन्ना यांच्यासोबत कधीच काम करणार नसल्याचंही म्हटलं होतं. “काही लोक असे असतात ज्यांच्यासोबत तुम्ही काम करू नये. माझे वडील त्यापैकीच एक आहेत. अमिताभ बच्चनसुद्धा त्यापैकी एक आहेत. त्यांच्यासोबत एकाच चौकटीत आत्मविश्वासाने उभं राहणं अशक्य आहे. त्यांचा पडद्यावरचा वावर खूप प्रभावी आहे. पडद्यावर माझ्या वडिलांची बरोबरी करणं खूप कठीण आहे. पडद्यावरचा इतका प्रभावी वावर तुमच्यात आपसूकच असतं किंवा नसतं. स्पष्टपणे बोलायचं झाल्यास, माझ्यात ते नाहीये. पडद्यावरचा माझा वावर तितका प्रभावी नाही. असे काही कलाकार जे तुम्हाला पडद्यावर पूर्णपणे भारावून टाकतात, माझे वडील त्यापैक एक आहेत,” असं तो म्हणाला होता.




असं असूनही अक्षय खन्नाने 2004 मध्ये ‘दीवार: लेट्स ब्रिंग अव्हर हिरोज बॅक’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं. विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय.