Bobby Deol | जेव्हा बॉबी देओल करायचा धर्मेंद्र यांचा तिरस्कार; हेमा मालिनीसोबतच्या लग्नानंतर नात्यात दुरावा
बॉलिवूड इंडस्ट्रीतील देओल कुटुंब हे अनेकांचं लोकप्रिय कुटुंब आहे. धर्मेंद्र आणि त्यांची मुलं सनी देओल-बॉबी देओल यांच्यातील खास नातं माध्यमांपासून कधीच लपलं नाही. मात्र एक असाही काळ होता, तेव्हा बॉबी त्याच्या कुटुंबापासून दुरावला होता.
मुंबई | 15 सप्टेंबर 2023 : देओल कुटुंबातील लोकप्रिय सदस्यांपैकी एक म्हणजे बॉबी देओल. बॉबी देओलने नेहमीच त्याच्या लूक, स्वभाव आणि दमदार अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्याने बऱ्याच उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांसोबत बॉबीचं त्याचे वडील धर्मेंद्र आणि भाऊ सनी देओल यांच्यासोबतचं खास नातंसुद्धा विशेष चर्चेत राहिलं आहे. मात्र एक वेळ अशीही होती, जेव्हा बॉबी त्याच्या वडिलांचा खूप तिरस्कार करायचा. एका मुलाखतीत खुद्द बॉबीने याविषयीचा खुलासा केला होता. तो 18 वर्षांचा असताना त्याचे वडिलांसोबत खटके उडू लागले होते.
बॉबी देओल आणि धर्मेंद्र यांच्यात इतक्या टोकाचा वाद होऊ शकेल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. मात्र एकेकाळी मी स्वत:ला कुटुंबीयांपासून फार दूर केलं होतं आणि बंडखोरी करू लागलो होतो, असं खुद्द बॉबीने म्हटलं होतं. “मी 18 वर्षांचा असताना डिस्कोमध्ये गेलो होतो. त्यानंतर माझ्यात बंडखोरीची भावना जागृत झाली. त्यानंतर काही वर्षे मी आईवडिलांपासून बऱ्याच गोष्टी लपवत होतो. वडील काय म्हणायचे, त्याकडे मी दुर्लक्ष करायचो. जरी ते माझ्या भल्यासाठीच म्हणत होते, तरी मी जणू आंधळा झालो होतो. ते जे काही म्हणायचे, ते मी ऐकणं टाळलं होतं. तो एक असा काळ होता, जेव्हा माझं वडिलांसोबतचं नातं अत्यंत वाईट टप्प्यातून जात होतं”, असं बॉबीने सांगितलं होतं.
View this post on Instagram
धर्मेंद्र यांनी विवाहित असताना अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. त्यांच्या या लग्नानंतर देओल कुटुंबीयांनी कठीण काळाचा सामना केला. त्यावेळी धर्मेंद्र आणि बॉबी देओल यांच्यातील वितुष्टसुद्धा चर्चेत होतं. कुटुंबात आणि नात्यांमध्ये झालेल्या अचानक बदलामुळे बॉबीवर फार परिणाम झाला होता. मात्र काळानुसार हळूहळू नात्यांमधील हे वितुष्ट कमी होऊ लागलं. आता संपूर्ण देओल कुटुंब सुखदु:खात एकत्र असल्याचं पहायला मिळतं.
बऱ्याच वर्षांनंतर हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलचंही तिच्या सावत्र भावंडांशी नातं सुधारल्याचं पहायला मिळालं. ईशाने ‘गदर 2’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. यावेळी ती सनी देओल आणि बॉबी देओलसोबत दिसली होती. तिघांनी पापाराझींसमोर एकत्र फोटोसाठी पोजसुद्धा दिले होते.