Dharmendra | “बहिणीच्या लग्नात मोठे भाऊ का नाहीत?”; पत्रकाराच्या प्रश्नावर भडकून धर्मेंद्र म्हणाले..
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे त्यांच्या खासगी आयुष्याविषयी कधीच मोकळेपणे व्यक्त झाले नाहीत. मात्र ‘हेमा मालिनी : द ड्रीम गर्ल’ या चरित्रात त्यांनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीसोबतच्या नात्याविषयी लिहिलं होतं.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं कुटुंब गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल नुकताच लग्नबंधनात अडकला. करणच्या लग्नसोहळ्याला संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. मात्र यावेळी धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली कुठेच दिसल्या नाहीत. याउलट धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा लग्नातील फोटो तुफान व्हायरल झाला. या घटनेनंतर धर्मेंद्र यांनी गुरुवारी हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींसाठी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली होती. धर्मेंद्र यांच्या या पोस्टनंतर इशा देओलनंही इन्स्टाग्रावर वडिलांसाठी भावूक पोस्ट लिहिली. त्यामुळे देओल आणि हेमा मालिनी यांच्या कुटुंबात सर्वकाही ठीक नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. यादरम्यान धर्मेंद्र यांचा जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे.
हा व्हिडीओ मुलगी इशा देओलच्या लग्नातील आहे. या लग्नसोहळ्यात एक पत्रकार धर्मेंद्र यांना प्रश्न विचारतो की, “बहिणीच्या लग्नात मोठे भाऊ कुठेच दिसत नाहीयेत?” त्यावर त्यांचा राग अनावर होतो आणि “तुम्ही काहीही बडबडू नका”, असं धर्मेंद्र त्या पत्रकाराला सुनावतात. प्रकाश कौर यांच्याशी विवाहित असताना धर्मेंद्र बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनीच्या प्रेमात पडले. या दोघांनी 1980 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या वेळी धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. 1981 मध्ये हेमा यांनी ईशाला जन्म दिला तर 1985 मध्ये अहानाचा जन्म झाला. धर्मेंद्र आणि पहिली पत्नी प्रकाश कौर यांना सनी देओल, बॉबी देओल ही दोन मुलं आणि विजीता- अजीता या दोन मुली आहेत.
View this post on Instagram
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे त्यांच्या खासगी आयुष्याविषयी कधीच मोकळेपणे व्यक्त झाले नाहीत. मात्र ‘हेमा मालिनी : द ड्रीम गर्ल’ या चरित्रात त्यांनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीसोबतच्या नात्याविषयी लिहिलं होतं. धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्यापूर्वी बऱ्याच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रकाश कौर यांना भेटल्याचं हेमा यांनी लिहिलं होतं. मात्र लग्नानंतर दोघी पुन्हा कधीच समोर आल्या नाहीत. “मला कोणाच्याच आयुष्यात व्यत्यत आणायचा नव्हता. धरमजी यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे काही केलं, त्याने मी खुश होते. त्यांनी प्रत्येक वडिलाप्रमाणे आपली वडिलांची जबाबदारी पार पाडली. या गोष्टीने मीसुद्धा खुश आहे”, असंही त्यांनी चरित्रात म्हटलं होतं.