Duniyadari | नितेश राणेंच्या ‘त्या’ मदतीमुळे पूर्ण होऊ शकला ‘दुनियादारी’; वाचा किस्सा
विशेष म्हणजे याच कॉलेजमध्ये मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाची शूटिंग झाली होती. अखेर गुणवत्तेशी तडजोड होऊ न देता मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळावेत यासाठी नितेश राणे यांनी महाराष्ट्र कलानिधीची स्थापना केली.
मुंबई | 19 जुलै 2023 : संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. 19 जुलै 2013 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अगदी पहिल्या दिवसापासूनच ‘दुनियादारी’चे सर्व शोज हाऊसफुल होते. निर्माते-दिग्दर्शकांना त्याविषयीचे सतत फोन कॉल्स येत होते. संजय जाधव यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. मात्र ‘दुनियादारी’ला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील ‘महाराष्ट्र कलानिधी’ या संस्थेनं चित्रपटाची मोठी मदत केली होती.
सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ या कादंबरीवर आधारित ‘दुनियादारी’ चित्रपटात तरुणाईची कथा, कॉलेजचं जीवन दाखवण्यात आलं होतं. कॉलेजमधील बहुतांश शूटिंग ही पुण्यात झाली होती. पण पुण्यातील लोकेशन्सचा मोठा खर्च ते उचलू शकले नव्हते. “माझा चित्रपट कॉलेज, तरुणाई आणि त्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे. मला लोकेशन्सच्या बाबतीत तडजोड करायची नव्हती. आधी सांगलीचा एक कॉलेज आणि नंतर कोल्हापुरातील शालिनी पॅलेस ठरवलं होतं. पण तिथे शूटिंग होऊ शकली नाही. नंतर मला पुण्यातील कृषी महाविद्यालयाचा परिसर त्यासाठी अगदी योग्य वाटला. पण या लोकेशनची एका दिवसाची फी तब्बल दोन लाख रुपये होती. आम्हाला तिथे पंधरा दिवस शूटिंग करायचं होतं. त्यामुळे संपूर्ण लोकेशनचा खर्च एका मराठी चित्रपटाच्या बजेटइतका होता”, असं त्यांनी सांगितलं.
View this post on Instagram
विशेष म्हणजे याच कॉलेजमध्ये मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाची शूटिंग झाली होती. अखेर गुणवत्तेशी तडजोड होऊ न देता मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळावेत यासाठी नितेश राणे यांनी महाराष्ट्र कलानिधीची स्थापना केली. चित्रपट निर्मात्यांना लोकेशन्सच्या खर्चात मदत करण्यासाठी व्हिडीओकॉन कंपनी मिळाली, असं नितेश राणे यांनी सांगितलं.
मराठी चित्रपटसृष्टीतील मल्टिस्टारर चित्रपट ‘दुनियादारी’ने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचले होते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल होते. 270 थिएटरमध्ये दररोज 710 शोज आणि दर आठवड्याला 5 हजारांहून अधिक शोजचा या चित्रपटाचा विक्रम आहे. स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर यांसोबतच इतर बऱ्याच कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.