कोण होती दिशा सालियान? सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्तीशी काय कनेक्शन?
दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्यावर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. दिशाच्या मृत्यूच्या पाच वर्षांनंतर आता तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव केली आहे. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केलाय.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियानने आत्महत्या केली नव्हती, तर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसंच दिशाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह इतरांना आरोपी करून अटक करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
कोण होती दिशा सालियान?
कर्नाटकच्या उडुपी याठिकाणी जन्मलेली दिशा सालियान ही सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने वरुण शर्मा, सुशांत सिंह राजपूत, भारती सिंह यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत काम केलं होतं. याशिवाय ती बऱ्याच जाहिरातींच्या एजन्सीसोबतही जोडली गेली होती. टीव्ही अभिनेता रोहन रॉयला ती डेट करत होती आणि मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडाही झाला होता.
रिया चक्रवर्तीशी काय कनेक्शन?
2020 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री रिया चक्रवर्तीलाही दिशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. कारण रिया आणि सुशांत एकमेकांना डेट करत होते आणि दिशा ही सुशांतची मॅनेजर होती. दिशाशी तुझी भेट कशी झाली, यावर रिया म्हणाली होती, “मी सुशांत सिंह राजपूतच्या माध्यमातूनच दिशाला भेटले होते. मी जेव्हा सुशांतच्या घरी गेले होते, तेव्हा आमची औपचारिक भेट झाली होती. त्यावेळी दिशा तिच्या टीमसोबत त्याच्या घरी उपस्थित होती.”




दिशाचा मृत्यू कधी आणि कसा झाला?
9 जून 2020 रोजी दिशा सालियानचा मुंबईतील मालाड इथल्या एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. नंतर दिशाच्या मृत्यूला सुशांतच्या मृत्यूशीही जोडण्यात आलं होतं. कारण त्याच्या 5 दिवसांनी म्हणजेच 14 जून 2020 रोजी सुशांतचं निधन झालं होतं. 28 वर्षीय दिशाच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. तर ऑगस्ट 2021 मध्ये पोलिसांनी याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केली होती. पोलिसांच्या मते याप्रकरणी त्यांना कोणतेच पुरावे मिळाले नाहीत.
प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक जबाब
दिशाच्या मृत्यूबाबत आणि आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत तिच्या पालकांनी समाधान व्यक्त केलं होतं. तसंच पोलिसांच्या तपासाबाबत कोणतीही तक्रार नसल्याचं म्हटलं गेलं होतं. परंतु आता दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल करून दिशाची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. या याचिकेत प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाचा दाखला देण्यात आला आहे. त्यानुसार, एका बॉलिवूड पार्टीमध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतरांच्या उपस्थितीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होताना दिशाने पाहिलं होतं. त्यामुळेच आधी तिच्यावरही सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. परंतु, तिचा मृतदेह मालाड इथल्या एका इमारतीजवळ ठेवून तिची आत्महत्या केल्याचं भासवण्यात आलं, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.