Ravindra Mahajani | रवींद्र महाजनी यांचा शेवटचा संवाद कोणाशी झाला? सफाई कर्मचारीने सांगितली घटना
रवींद्र महाजनी यांच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याने शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास शेजारच्यांनी पोलिसांना याविषयी कळवलं. महाजनी यांचा शेवटचा संवाद कोणाशी आणि कधी झाला याविषयीची माहिती समोर आली.
पुणे : दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडे इथल्या सदनिकेत ते मृतावस्थेत आढळले. तळेगाव दाभाडेमधील आंबी इथल्या क्सर्बिया सोसायटीमध्ये ते भाडेतत्त्वावर राहत होते. गेल्या आठ महिन्यांपासून ते या सदनिकेत एकटेच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर रवींद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी मुंबईत राहतो. रवींद्र महाजनी यांच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याने शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास शेजारच्यांनी पोलिसांना याविषयी कळवलं. महाजनी यांचा शेवटचा संवाद कोणाशी आणि कधी झाला याविषयीची माहिती समोर आली. त्यांच्या इमारतीत हाऊस किपिंगचं काम करणाऱ्या महिलेनं याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
महाजनी यांना मंगळवारी शेवटचं पाहिलं
“मी या इमारतीत दररोज कचरा घ्यायला यायचे. मंगळवारी मी त्यांना शेवटचं पाहिलं होतं. त्यानंतर मी त्यांना पाहिलं नाही. कचरा देताना ते थोडंफार बोलायचे, तेवढंच. त्याशिवाय माझा त्यांच्याशी काही संवाद झाला नाही. काल कचरा घ्यायला आल्यावर वास येऊ लागला तेव्हा मी माझ्या सरांना याबद्दलची माहिती दिली. नेहमी मी दरवाजा ठोकल्यानंतर त्यांचा आवाज यायचा, पण काल आतून त्यांनी काही आवाजही दिला नाही”, अशी माहिती सफाई कर्मचारी आदिका वारंगे यांनी दिली.
“मंगळवारी मी त्यांना शेवटचं पाहिलं. त्यादिवशी त्यांनी माझ्या हातात कचरा दिला. बुधवारी माझा वीकली ऑफ होता. गुरुवारी ते झोपले असावेत या विचाराने मी दार ठोठावलं नाही. त्यांनी कचरा बाहेर ठेवला नव्हता. मी निघून गेले. त्यानंतर शुक्रवारी जेव्हा मी आले तेव्हा दोन दिवसाचा कचरा असेल म्हणून दार ठोठावलं. पण आतून मला काहीच उत्तर मिळालं नाही”, असं त्यांनी पुढे सांगितलं.
महाजनी यांच्या मृतदेहाची अवस्था पाहिल्यानंतर त्यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वीच झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानंतर पोलिसांनी याबद्दलची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. गश्मीर तळेगाव दाभाडेला पोहोचल्यानंतर महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. यावर अद्यार गश्मीरची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. गश्मीरची आई आजारी असल्याने त्यांना याबद्दल अद्याप सांगण्यात आलं नाही. त्यामुळे महाजनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे पार पडतील, हे अद्याप निश्चित नाही.