गीतकाराचा बोल जिव्हारी लागल्याने गायकीच सोडली; शीलादेवींचा हा किस्सा माहीत आहे का?
गायिका शीलादेवी या आंबेडकरी चळवळीतील जुन्याजाणत्या गायिका आहेत. गायिका म्हणून जम बसविल्यानंतर अचानक एका गीतकाराने त्यांना डिवचले. (shila devi)
मुंबई: गायिका शीलादेवी या आंबेडकरी चळवळीतील जुन्याजाणत्या गायिका आहेत. गायिका म्हणून जम बसविल्यानंतर अचानक एका गीतकाराने त्यांना डिवचले. तू माझेच गाणे गातेस… असे बोल या गीतकाराने शीलादेवींना सुनावले. हे बोल जिव्हारी लागल्याने शीलादेवींनी थेट गायकीतून संन्यास घेतला. पोटापाण्यासाठी व्हिडीओ कॅसेट विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नेमका काय आहे हा किस्सा? वाचा सविस्तर. (Why did veteran singer shila devi quit singing?)
गाणं सोडलं, कॅसेट विक्री सुरू
1988 ची ही गोष्ट आहे. कांदिवली पोलीस स्टेशनसमोर स्थानिक मंडळाने शीलादेवी आणि गायक, गीतकार नवनीत खरे यांचा सामना ठेवला होता. हा सामना चांगलाच रंगात आला होता. प्रेक्षकही गीतांचा आनंद लुटण्यात मश्गुल झाले होते. इतक्यात नवनीत खरे यांनी त्यांना डिवचले. तू आजही माझीच गाणी गात माझ्या नावावर पोट भरत आहेस, असं खरे म्हणाले. खरे यांचे हे बोल शीलादेवींच्या चांगलेच जिव्हारी लागले. त्याचवेळी भर कार्यक्रमात शीलादेवींनी आजपासून गायन क्षेत्रातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. त्या दिवसापासून त्यांनी गाणं गायचंच बंद केलं. खरेंनीही शीलादेवींच्या घरी येऊन त्यांच्या गाण्याचं बाड नेलं. शीलादेवींनी गाणं गायचं बंद केल्याने त्यांनी नंतर कोणत्याही गीतकाराकडे गाणं मागितलं नाही. पण, गाणं बंद केल्याने त्यांच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. त्यामुळे त्यांनी कांदिवलीत व्हिडिओ कॅसेटची लायब्ररी सुरू केली. कॅसेट विक्री करून त्या गुजराण करू लागल्या. पण त्यातूनही पुरेशी मिळकत होत नसल्याने त्यांनी केबल नेटवर्कचा व्यवसाय सुरू केला.
अन् कॅसेट काढण्याची इच्छा अपूर्णच राहिली
शीलादेवींनी लोकशाहीर विठ्ठल उमप आणि विठ्ठल हेदकरांबरोबर कॅसेटमध्ये गाणी गायली. पण त्यांच्या स्वतंत्र गाण्याची कॅसेट कधी बाजारात आली नाही. गायक श्रावण यशवंतेंना त्यांचा आवाज आवडायचा. त्यांना शीलादेवींना घेऊन कॅसेट काढायची होती. पण यशवंते यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे कॅसेट काढण्याचं राहून गेलं. पुढे एकदा त्यांना रेडिओवर गाण्याची संधी चालून आली होती. त्या रेडिओवर ऑडिशनसाठीही गेल्या होत्या. पण तिथेही त्यांना दुर्देव आड आलं. त्यांचा नंबर येताच ऑडिशनची वेळ संपली. त्यामुळे त्यांची संधी हुकली. त्यानंतर त्याही नंतर आकाशवाणीकडे फिरकल्या नाही.
कसोटीचा काळ
शीलादेवींच्या वाट्याला सुखाच्या क्षणापेक्षा दुखाचे क्षण अधिक आले. 1978 हे वर्ष तर त्यांची परीक्षा पाहणारेच होते. त्यावेळी त्या थिएटरमध्ये कव्वालीचा सामना करायच्या. त्यावेळी त्यांना 250 रुपये मानधन मिळायचं. हे कार्यक्रम महिनाभर सुरू होते. त्यावेळी त्यांना फणफणून ताप आला होता. पण अंगात ताप असतानाही त्यांनी हे कार्यक्रम केले. कार्यक्रम झाल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास पायी चालत त्या कांदिवलीतील हनुमान नगरातील घरी यायच्या. त्यावेळी मुलगा राजेश आणि मुलगी संगीता यांची आबाळ होऊ नये म्हणून त्यांनी या दोन्ही मुलांना नागपूरच्या कामठी येथील वसतिगृहात शिकायला पाठवलं. दुसरी मुलगी अनिता घरी क्षयरोगाने आजारी होती. तिच्याकडे पाहायलाही त्यांना वेळ नसायचा. या आजारपणातच अनिताचा मृत्यू झाला. हा काळ आपल्यासाठी प्रचंड कसोटीचा होता, असं त्या सांगतात.
नंतर कलावंताला कुणीही विचारत नाही
गायकी क्षेत्रात येणं ही आपली मजबुरी होती. तसं हे क्षेत्रं नापसंतच होतं. त्यामुळे मुलांना या क्षेत्रात येऊ दिलं नसल्याचं त्या सांगतात. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या आग्रहाखातर या क्षेत्रात राहिल्याचंही त्या आवर्जुन सांगतात. कलावंत गात, लिहीत असतो, तोपर्यंत समाज त्याला बोलावतो. पण जेव्हा तो डगमगतो, तेव्हा त्याला कुणीच आधार देत नाही. त्यांना कुणीही आर्थिक मदत देत नाही. प्रसिद्ध गायक लक्ष्मण राजगुरू, जनार्दन धोत्रे, राजानंद गडपायले, सायरा बेगम आणि शकीला पुनवी यांच्या बाबतीत हेच घडल्याचं त्या सांगतात. (साभार: आंबेडकरी कलावंतमधून) (Why did veteran singer shila devi quit singing?)
संबंधित बातम्या:
मुलाच्या निधनाची तार आली, पण शाहिरी कार्यक्रम थांबले नाही; शाहीर इंगळेंचा हा किस्सा वाचाच!
‘जलसे’ जिवंत राहण्याची तळमळ, शाहिरीत नवे प्रयोग; वाचा, शाहीर इंगळे आणि त्यांची जडणघडण
(Why did veteran singer shila devi quit singing?)