Gashmeer Mahajani | “त्यांनी आमचे नंबर ब्लॉक केले”; वडील रवींद्र महाजनींबद्दल गश्मीर व्यक्त
गश्मीर महाजनी 15 वर्षांचा असताना त्याचे वडील रवींद्र महाजनी घर आणि कुटुंबाला सोडून वेगळे राहू लागले होते. इतकंच नव्हे तर जवळपास तीन वर्षांपूर्वी त्यांनी सर्व कुटुंबीयांचे फोन नंबरसुद्धा ब्लॉक केले होते. यामागचं कारण गश्मीरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : सोशल मीडिया हे सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच व्यक्त होण्यासाठी सहज उपलब्ध माध्यम आहे. मात्र अनेकदा त्यावर व्यक्त होताना एखाद्या परिस्थितीची किंवा व्यक्ती दुसरी बाजू पाहिली जात नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर असंच काहीसं पाहिलं गेलं. तळेगाव इथल्या एका खोलीस त्यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्या निधनानंतर दोन दिवसांनी याबद्दलची माहिती सर्वांना मिळाली होती. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर सर्वसामान्यांनी विविध प्रश्नांचा भडीमार केला. अनेकांनी त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीवर टीका केली. पितापुत्राच्या नात्यावरही प्रश्न उपस्थित केले गेले. या सर्व ट्रोलिंगवर अखेर गश्मीर मोकळेपणे व्यक्त झाला. ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गश्मीरने घडलेली सर्व घटना आणि त्यामागील पार्श्वभूमी उलगडून सांगितली.
“ते कधीच दुसऱ्यांच्या हातचं जेवण जेवायचे नाही”
गश्मीर 14-15 वर्षांचा असतानाच रवींद्र महाजनी हे कुटुंबीयांना सोडून निघून गेले होते. तेव्हापासून गश्मीरने कुटुंबाची जबाबदारी उचलली होती. याविषयी तो म्हणाला “ते आमच्याकडे फक्त त्यांच्या मर्जीनेच आले. कधी सणाला तर कधी त्यांना वाटलं तेव्हा ते यायचे आणि जायचे. ते आर्थिकदृष्ट्या सबळ होते. त्यामुळे कुठल्याही हलाखीच्या परिस्थितीत त्यांचं निधन झालं नाही. माझ्याकडे जरी ते राहायला आले तरी स्वत:ची कामं ते स्वत:च करायचे. ते दुसऱ्यांच्या हातचं जेवणसुद्धा जेवायचे नाही. माझ्या घरी आले तरी ते स्वत: जेवण बनवून जेवायचे. त्यांना केअरटेकर नको होता. आम्ही त्यांच्या घरी मदतीला कोणाला पाठवलं तरी ते नकार द्यायचे. त्यांच्या निधनाच्या एक आठवड्याआधी ते व्यवस्थित जिमला जात होते. त्यांची ही जगण्याची पद्धत होती. एखाद्या माणसाला एकटं राहायला आवडचं. यात कोणालाच दोष देता येणार नाही.”
कुटुंबीयांचे फोन नंबर केले ब्लॉक
“मी 15 वर्षांचा असतानाच ते आमच्यापासून वेगळे झाले. गेल्या तीन वर्षांपासून ते फारच एकटे राहू लागले होते. मला जेव्हा मुलगा झाला, तेव्हा जन्माच्या वेळीच त्यांनी नातवाचा चेहरा पाहिला होता. त्यानंतर ते पुन्हा निघून गेले आणि परत आलेच नाहीत. मी अधूनमधून त्यांना मुलाचे फोटो आणि व्हिडीओ पाठवायचो. एक-दोनदा त्यांनी ते पाहिलं आणि नंतर माझा नंबर ब्लॉक केला. ही तीन-साडेतीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. यात मी कोणालाच दोष देत नाही. पण त्यांची बाजू काय असेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कदाचित नातवाचे फोटो आणि व्हिडीओ पाहून ते हळवे होऊ लागले होते. त्यामुळे पुन्हा त्यांना कुटुंबात अडकायचं नव्हतं. म्हणून त्यांनी आमचे नंबर ब्लॉक केले असावेत”, असं तो पुढे म्हणाला.
11 जुलै रोजी रवींद्र महाजनी तळेगाव दाभाडे इथल्या एका खोलीत मृतावस्थेत आढळले होते. त्यांचं निधन कार्डिॲक अरेस्टने झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.