Ravindra Mahajani | मुलगा मोठा स्टार तरी रवींद्र महाजनी का राहायचे एकटे? धक्कादायक अवस्थेत सापडला मृतदेह
रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला. तर बालपण मुंबईत गेलं. त्यांना आधीपासूनच अभिनयाची आवड होती. लहानपणापासूनच ते नाटकात-चित्रपटात शाळेच्या स्नेहसंमेलनात काम करायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावलं.
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी शुक्रवारी तळेगाव दाभाडे इथल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. गेल्या काही महिन्यांपासून ते तळेगाव दाभाडे इथल्या एका सदनिकेत भाडेतत्त्वावर राहत होते. ते राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. महाजनी यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी मुंबईत राहतो. गश्मीरला याबद्दलची माहिती पोलिसांनी दिली असून तो तळेगाव दाभाडेला रवाना झाला आहे. शवविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे. मात्र या सर्व प्रकरणात रवींद्र महाजनी गेल्या काही महिन्यांपासून एकटे का राहत होते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुलगा इतका मोठा स्टार असूनही महाजनी हे तळेगाव दाभाडेला एकटे भाडेतत्त्वावर का राहत होते, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या दिवसांत त्यांच्याशी कोणीच संपर्क केला नाही का, असाही सवाल उपस्थित होत आहे. गश्मीर हा मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीतही लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने हिंदी मालिका आणि रिॲलिटी शोजमध्येही भाग घेतला आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ या चित्रपटात रवींद्र आणि गश्मीर महाजनी एकत्रच झळकले होते.
View this post on Instagram
रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला. तर बालपण मुंबईत गेलं. त्यांना आधीपासूनच अभिनयाची आवड होती. लहानपणापासूनच ते नाटकात-चित्रपटात शाळेच्या स्नेहसंमेलनात काम करायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावलं. रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी मिळाली. 1974 साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि रवींद्र महाजनी चांगलेच प्रसिद्ध झाले. यानंतर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये भूमिका केल्या, ज्या चांगल्याच गाजल्याही.
मराठी सिनेसृष्टीतील रुबाबदार, देखणा नट म्हणून रवींद्र महाजनी यांची ओळख होती. त्यांनी आपल्या रुबाबदार व्यक्तीमत्त्वाच्या जोरावर एककाळ गाजवला. 1975 ते 1990 या काळात यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. त्यांनी केलेले सिनेमेही चांगलेच गाजले. मुंबईचा फौजदार, देवता, झुंज, आराम हराम आहे. लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, गोंधळात गोंधळ आदी सिनेमे चांगलेच गाजले. तर बेलभंडार आणि अपराध मीच केला ही त्यांची नाटकेही गाजली.