देवेंद्र फडणवीसांनंतर भाजपकडून महाराष्ट्रातील आणखी तीन नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या व्यवस्थापन आणि संघटनकौशल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाला प्रभावित केले होते. | Pankaja Munde and Vinod Tawde in national Politics
नवी दिल्ली: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बिहार निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात आपली छाप पाडल्यानंतर आता भाजपकडून महाराष्ट्रातील आणखी काही नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपकडून नुकतीच राज्यनिहाय प्रभारींची नवी यादी जाहीर करण्यात आली. (Pankaja Munde and Vinod Tawde find new roles in BJP in charge of Madhya pradesh and Haryana)
यामध्ये विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याकडे हरियाणाचे प्रभारीपद सोपवण्यात आले आहे. तर मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर त्रिपुरात डाव्यांची सत्ता उलथवून भाजपचे कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या सुनील देवधर यांची आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पंकजा मुंडे या गेल्या बऱ्याच काळापासून भाजपच्या राज्य नेतृत्त्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. तर विनोद तावडे यांनाही गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे हे दोन्ही नेते पक्षावर नाराज होते. मात्र, काही दिवसांपूर्वी भाजपकडून या दोन्ही नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत सामावून घेण्यात आले होते. तेव्हाच भाजप पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना भविष्यात राष्ट्रीय राजकारणात सक्रिय करणार असल्याचे संकेत मिळाले होते.
भाजपने नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली होती. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या व्यवस्थापन आणि संघटनकौशल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाला प्रभावित केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांच्यावेळी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. तसेच त्यांनी स्वत:ही अनेक सभा घेऊन बिहारमध्ये भाजपसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे आता विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनाही अशीच कामगिरी करता येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या:
देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, शरद पवारांची मिष्किल टिप्पणी
(Pankaja Munde and Vinod Tawde find new roles in BJP in charge of Madhya pradesh and Haryana)