नो मास्क नो देवदर्शन!, ‘या’ मंदिरांमध्ये दर्शनासाठी जात असाल तर मास्क घेऊनच घराबाहेर पडा…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, मंदिरात मास्कसक्ती...
मुंबई : चीनसह अन्य देशातही कोरोनाचे रुग्ण (China Coronavirus) वाढत आहेत. जगभर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. अशात भारतातही सतर्कता बाळगली जात आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांची टेस्ट केली जात आहे. शिवाय परदेशातून येणाऱ्या प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाचं जिनोम सिक्वेन्सिंग व्हावं, असे आदेशही केंद्र सरकारने दिले आहेत. महाराष्ट्रातही सतर्कता (Mask Compulsory) बाळगली जात आहे.
मंदिरामध्ये मास्कसक्ती
मंदिरात देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत. देवदर्शनासाठी जात असताना तुम्हाला मास्क घालणं बंधनकारक असेल.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मास्क लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नाशिकमधल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जात असाल तर मास्क घेऊन जा. कारण सप्तशृंगी मंदिर परिसरात नो मास्क, नो एंट्री! या नियमाची कडक अंमलबजावणी केली जात आहे.
अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरातही मास्क घालूनच मंदिरात प्रवेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे भाविक मास्क न घालता मंदिरात येत आहेत, त्यांना मंदिरातर्फे मास्कचे वाटप करण्यात येत आहे.
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातही मास्क शिवाय प्रवेश नाहीये. भाविकांना आपआपसात अंतर राखूनच राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. भाविकांना देव दर्शनासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या भक्तांनाही नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
देहूच्या मुख्य मंदिरात भाविकांना मास्कसक्ती नाही, मात्र कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना देहू संस्थानने दिल्या आहेत.
त्यामुळे जर देवदर्शानाचा प्लॅन असेल. तर मंदिरात जाताना मास्क लावूनच जा. स्वत:ची आणि दुसऱ्यांचीही काळजी घ्या…