कमालच झाली, कोरोनाच्या ट्रीटमेंटमुळे नवजात बाळाच्या डोळ्यांचा रंगच बदलला
कोरोनाच्या जागतिक साथीने अनेकांचे जीवनच बदलून गेले. अनेकांनी आपले आप्तस्वकीयांना गमावले. एका बाळाच्या डोळ्यांचा रंग देखील या कोरोनाच्या ट्रीटमेंटमुळे अचानक बदलल्याची विचित्र घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे...
नवी दिल्ली | 7 ऑगस्ट 2023 : कोविड – 19 च्या साथीने जगाला अनेक प्रकारचे धक्के दिले. या साथीचा जगावर झालेला मानसिक आणि आर्थिक परीणाम काय लक्षात ठेवला जाईल. या जीवघेण्या साथीत लाखो लोकांचे बळी घेतले. अनेक जणांनी आपले जीवलग गमावले. आताही कोरोनाचे विविध प्रकार अधूनमधून डोके वर काढतच आहेत. आता कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटने मध्य पूर्वेतील देशात पुन्हा डोकेवर काढले आहे. या साथीवर लसींचा शोध लावण्यात आल्याने अनेकांचे प्राण वाचल्याचे म्हटले जात आहे. परंतू कोरोनाची ट्रीटमेंट घेतल्याने एका नवजात बालकाच्या डोळ्यांचा रंगच बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
थायलंड येथे एका सहा महिन्यांच्या बाळाला कफ आणि ताप आल्याने त्याची कोरोना टेस्ट केली असता कोविड-19 पॉझिटीव्ह असे निदान झाले. या बाळावर उपचार सुरु करण्यात आले. या उपचारात कोरोना प्रतिबंधक उपचारानंतर बाळाला सौम्य अतिसार आणि इतर सामान्य लक्षणे दिसत होती. परंतू सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या तान्हुल्यालावर कोरोनाचे उपचार सुरु झाल्यानंतर अवघ्या 18 तासानंतर त्याच्या डोळ्यांचा रंग बदलल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या आईने बाळाला जेव्हा सुर्यप्रकाशात धरले त्यावेळी तिला डोळ्यांचा रंग निळा झालेला आढळला. याआधी बाळाचे डोळे चॉकलेटी रंगाचे होते. त्यामुळे डॉक्टरही आणि तज्ज्ञ देखील आश्चर्यचकीत झाले आहेत.
उपचार थांबविले
फ्रंटीयर्सने दिलेल्या वृत्तानुसार, बाळाच्या डोळ्यांच्या रंगामध्ये झालेला असामान्य बदल, आलेला निळा रंग त्याच्या शरीराच्या इतक भागात दिसलेला नाही. शरीराच्या इतर भागांमध्ये, जसे की त्वचा, नखे किंवा नाकामध्ये दिसून आलेला नाही. सुदैवाने तीन दिवसांनंतर बाळाची तब्येत सुधारू लागली आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर सुरु केलेली कोरोना थेरपी बंद करण्याचा निर्णय घेतला. पाचव्या दिवशी, बाळाचा डोळ्याचा कॉर्नियाचा रंग त्याच्या सामान्य रंगात परत आला, त्यामुळे त्याच्या आईचा जीव भांड्यात पडला.
डोळ्यांचा रंग का बदलला ?
संसर्गानंतर 2 आठवड्यानंतर नेत्ररोग तज्ज्ञाने या बाळाचे डोळे जेव्हा तपासले. तेव्हा डोळ्याचा कॉर्नियाचा रंग सामान्य झाल्याचे आढळले. तो निळसर ऐवजी पूर्वीप्रमाणेच चॉकलेटी झाल्याचे आढळले. डोळ्यांचा रंग निळा कशामुळे झाला याविषयी वैद्यकीय तज्ज्ञांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. त्यांना अशी शंका आहे की हा असामान्य बदल विविध कारणांमुळे झालेला असू शकतो. औषधांचा परिणाम, बाळाची चयापचय क्रिया टॅब्लेटमध्ये आढळणारे टायटॅनियम डायऑक्साइड आणि येलो फेरिक ऑक्साइड असे औषधी घटकही कारणीभूत असू शकतात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.