First Picture of New Omicron Virus | जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा पहिला वहिला फोटो पाहिलात का?
नवा विषाणू नेमका कसा दिसतो, तो शरीराच्या नेमक्या कोणत्या भागात प्रवेश करतो, तो शरीरातले कोणते अवयव नष्ट करतो, त्याची लक्षणं कोणती हे सर्व अभ्यासण्यासाठी ह्या फोटोचा उपयोग होणार आहे
Omicron Variant Photo : यूरोप आफ्रिकेसह जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा पहिलावहिला फोटो आता समोर आलाय. इटलीतल्या विद्यापीठानं तो प्रसारीत केलाय. नवा विषाणू नेमका कसा दिसतो, तो शरीराच्या नेमक्या कोणत्या भागात प्रवेश करतो, तो शरीरातले कोणते अवयव नष्ट करतो, त्याची लक्षणं कोणती हे सर्व अभ्यासण्यासाठी ह्या फोटोचा उपयोग होणार आहे. महाराष्ट्रासह देशावर आलेलं हे कोरोनाचं नवं संकट नेमक्या कोणत्या रुपात आहे हे कळायलाही फोटोमुळे मदत होतेय.
कुणी फोटो प्रकाशित केलाय?
चीनपासून सुरु झालेलं कोरोनाचं संकट अजूनही संपताना दिसत नाहीय. गेल्या वर्षभरात जगभरात मृत्यूचं तांडव माजवल्यानंतर आता कोरोनाचाच नवा विषाणू उदयाला आलाय. त्याचं नाव जागतिक आरोग्य संघटनेनं ओमिक्रॉन (B.1.1.529) असं ठेवलेलं आहे. ओमिक्रॉनचे आतापर्यंत 13 देशात रुग्ण आढळलेले आहेत. पुढच्या काही काळात यात झपाट्यानं वाढ होऊ शकते असा अंदाजही वर्तवला जातोय. दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या डेल्टा व्हेरीएंटनं धूमाकुळ घातला. मृत्यूचं प्रमाणही झपाट्यानं वाढलं. आणि हा नवा विषाणू डेल्टापेक्षा जास्त घातक असल्याचा अंदाज जाणकार वर्तवतायत. त्यामुळेच त्याचा अभ्यास अजून तरी प्राथमिक स्तरावर असला तरी त्याचा पहिला फोटो काढण्यात तज्ञांना यश आलंय. हा फोटो बाम्बिनो गेसू रिसर्च ग्रुप (Bambino Gesu Research Group) स्टेट यूनिव्हर्सिटी ऑफ मिलान यांनी तयार केलाय. आणि ओमिक्रॉनचा पहिला फोटो ह्या टायटलखाली तो प्रसारीत करण्यात आलाय. हा फोटो Ansa.com वर प्रकाशीत केला गेलाय. (First Photo of Omicron from the Bambino Gesu Research Group)
फोटो नेमकं काय सांगतो?
ओमिक्रॉनचा हा फोटो तसा धक्कादायक गोष्टी उघड करणारा आहे. बहुतांश म्युटेशन्स हे मानवी पेशींशी संवाद होणाऱ्या भागात सापडले आहेत. त्यामुळे शरीर त्यांना कसा प्रतिसाद देतं किंवा शरीराच्या इतर कुठल्या भागात कोरोनाचा हा विषाणू कसा प्रभाव टाकतं याचा अभ्यास अजून होणे बाकी आहे. पण ह्या फोटोमुळे त्याच्या अभ्यासाला चालना मिळेल हे नक्की. बोत्सवाना, दक्षिण आफ्रिका, आणि हाँगकॉंगमध्ये जे ओमिक्रॉनचे रुग्ण सापडलेत त्यांच्या अभ्यासाअंती हा फोटो तयार केला गेलाय.
संबंधित बातम्या :
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनंतर महाराष्ट्र अलर्ट मोडवर, मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक
ओमिक्रॉनची दहशत जास्त धोका कमी, नवा वेरिएंट आफ्रिकेत 2 महिन्यांपासून, नेमकं काय घडतंय?